सोने-चांदी गाळणाऱ्या चिमण्यांचा धोका कायम

सोने-चांदी गाळणाऱ्या चिमण्यांचा धोका कायम

सोने-चांदी गाळणाऱ्या चिमण्यांचा धोका कायम
अनधिकृत व्यावसायिकांच्या गाळ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ ः काळबादेवीतील भीषण आगीनंतर येथील सोने-चांदी गाळणाऱ्या चिमण्या व अनधिकृत व्यावसायिकांच्या गाळ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. धूर सोडणाऱ्या काही चिमण्यांवरही पालिकेने कारवाई केली होती. त्यानंतर मात्र कारवाई थंडावल्याने चिमण्या व अनधिकृत व्यावसायिक पुन्हा सक्रिय झाले आहेत. काही दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत व्यावसायिक गाळे जळून खाक झाल्याने पुन्हा एकदा कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
काळबादेवीमध्ये आठ वर्षांपूर्वी लागलेल्या भीषण आगीशी झुंज देणाऱ्या अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांना शहीद व्हावे लागले होते. दुर्घटनेनंतर येथील अरुंद गल्ल्या, दाटीवाटीने व्यवसाय थाटून बस्तान बसवणारे फेरीवाले, तसेच अनधिकृतपणे सोने-चांदी गाळणाऱ्या चिमण्यांवर पालिकेने कारवाईला सुरुवात केली. काही चिमण्यांवर व फेरीवाल्यांवर पालिकेने धडक कारवाईही केली; मात्र पुढे दोन-तीन महिन्यांतच ती थंडावल्याने व्यावसायिक पुन्हा कार्यरत झाले आहेत. पालिकेने २०१३ मध्ये येथील सर्वेक्षण सुरू केले. त्या वेळी धूर ओकणाऱ्या २२०० चिमण्या होत्या. पालिकेने त्यातील काही चिमण्या काढून टाकल्या. पालिकेची कारवाई अधूनमधून सुरू असली तरी व्यावसायिकांच्या तीव्र विरोधामुळे त्यांच्यासमोर आव्हान निर्माण झाले आहे.

दाटीवाटीने वसलेल्या निवासी इमारती ८० ते ९० वर्षांपासून काळबादेवी परिसरात आहेत. सुमारे ६० ते ७० टक्के निवासी गाळ्यांचे व्यावसायिक दुकानांत रूपांतर झाले आहे. इमारतीत गोदामे, वाढवलेली बांधकामे आणि फेरीवाल्यांची संख्याही मोठी आहे. इमारतींसमोरील मोकळ्या जागा वाहने आणि फेरीवाल्यांनी अडवल्या आहेत. निवासी गाळ्यांचे व्यावसायिक दुकानांत रूपांतर करून अनधिकृतपणे राहणाऱ्या व्यावसायिकांवर पालिकेची ठोस कारवाई होत नसल्याने त्यांचे प्रमाण अद्याप थांबलेले नसल्याचे सांगण्यात येते. दोन दिवसांपूर्वी व्यावसायिक गाळ्यांना लागलेल्या आगीनंतर धूर सोडणाऱ्या चिमण्या व दाटीवाटीने व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेसमारे आव्हान
बहुतांश इमारतींतील लाकडी बांधकामे, अरुंद गल्ल्या, व्यावसायिक व निवासासाठी केले गेलेले बदल, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेले व्यवसाय आणि सोने-चांदी गाळून धूर ओकणाऱ्या सुमारे सातशेहून अधिक चिमण्यांवर कारवाई झालेली नाही. इमारतीचा मालक कोण, व्यवसाय कोणाचा इत्यादीचा शोध घेण्यास पालिकेला कठीण जात आहे.

रहिवाशांना धुराचा त्रास
काळबादेवी, नारायणवाडी, विठ्ठलवाडी, झवेरी बाजार, जंजीकर मार्ग, पोपळेवाडी, तेल गल्ली, कॉटन एक्स्चेंज, मुंबादेवी इत्यादी परिसरातील रहिवासी शहरीकरणाच्या विस्तारामुळे उपनगरांमध्ये विस्तारले आहेत. त्यांच्या परिसरातील जागांवर सोने-चांदीचे व्यावसायिक ठाण मांडून आहेत. तिथे सोने घडणावळीचे आणि दागिने पॉलिश करण्याचे काम सुरू झाले; परंतु त्या उद्योगामुळे परिसरात निर्माण होणाऱ्या दूषित धुरामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com