एसटी बँकेच्या निवडणुकीत चुरस

एसटी बँकेच्या निवडणुकीत चुरस

मुंबई, ता. १४ : सुमारे चार हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत या वर्षी चांगलीच चुरस वाढली आहे. गेल्या ७० वर्षांत पहिल्यांदा एसटी बँकेची सत्ता काबीज करण्यासाठी निवडणुकीत सात पॅनेल एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरली आहेत. सध्या एसटीची मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची बँकेत एकहाती सत्ता आहे. त्याविरोधात आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर, ॲड. गुणरत्न सदावर्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे किरण पावसकर आणि अपक्ष उमेदवार, एसटी कर्मचारी वर्कर्स काँग्रेस (इंटक), सेना, काँग्रेस आणि कास्ट्राईब संघटनेच्या युतीचे एक पॅनेल अशा एकूण सात पॅनेलमुळे निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे.

राज्यातील सुमारे एक लाख एसटी कर्मचारी या बँकेचे सभासद आहेत. त्यामुळे बँकेची दिवसेंदिवस उलाढाल वाढत असून, मालमत्तेमध्येसुद्धा भर पडत आहे. त्यामुळे बँकेतील विविध प्रवर्गांच्या १९ संचालकांच्या निवडणुकीला प्रचंड महत्त्व आले आहे. गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने आपले १९ संचालक एकहाती निवडून आणले होते. मात्र, कोरोना महामारी, त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा लढा आणि एसटी महामंडळात नव्याने आलेल्या कर्मचारी संघटनांमुळे बँकेच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे.

१९ संचालकपदासाठी तब्बल १४३ उमेदवार
सर्वसाधारण १४, महिला प्रतिनिधी दोन, अनुसूचित जाती-जमाती एक, इतर मागास प्रतिनिधी एक, भटक्या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी एक अशा एकूण एसटी बँकेच्या १९ संचालकपदासाठी निवडणूक होत आहे. या प्रवर्गामध्ये सर्वसाधारण मतदारसंघात ९८, अनुसूचित जाती-जमाती राखीव ११, इतर मागासवर्गीय राखीव आठ, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव १२; तर महिला राखीव १४ असे एकूण तब्बल १४३ उमेदवार १९ संचालकपदावर निवडून येण्यासाठी रिंगणात असल्याचे एसटी बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com