इलेक्‍ट्रिक बसवर आता ठाणे परिवहनची मदार

इलेक्‍ट्रिक बसवर आता ठाणे परिवहनची मदार

Published on

ठाणे, ता. १८ (वार्ताहर) : तोट्यात असलेल्‍या ठाणे परिवहन सेवेला सक्षम करण्यासाठी व्‍यवस्‍थापन आता इलेक्‍ट्रिक बसकडे वळू लागले आहे. इलेक्‍ट्रिक बसच्‍या समावेशानंतर परिवहनला घसघसशीत असे उत्‍पन्न मिळू लागल्‍याचे सभापती विलास जोशी यांनी सांगितले. पालिका आयुक्‍त अभिजीत बांगर यांनी नुकताच परिवहन समितीच्‍या कारभाराचा आढावा घेऊन माहिती घेतली; तर जुलैच्‍या अखेरीस आणखी ६७ इलेक्‍ट्रिक बसचा समावेश होणार असून नव्‍या मार्गावरून परिवहन सेवा धावेल, असे जोशी यांनी सांगितले.
अपुऱ्या बसच्या संख्येमुळे ठाणेकरांना इच्छित सुविधा देण्यास ठाणे परिवहन सेवा गेल्‍या काही वर्षांपासून असमर्थ ठरत आहे. त्‍यामुळे हे चित्र बदलण्यासाठी परिवहन व्‍यवस्‍थापनाकडून अनेक बदल करण्यात येत आहेत. यामध्ये सीएनजी आणि इलेक्‍ट्रिक बसचा अधिकचा भरणा करण्यात येत आहे. नुकतेच विभागाने दहा इलेक्‍ट्रिकल बसचा समावेश केल्‍याने परिवहनचे उत्पन्न २५ लाखावरून २६ लाखापर्यंत प्रतिदिन पोहोचले आहे. त्‍यामुळे जुलैअखेरीस आणखी ६७ इलेक्‍ट्रिक बसचा समावेश करून घेण्यात येणार आहे. यामध्ये २२ जूनला ९ मीटरच्‍या दहा; तर पुढील महिन्‍यात मोठ्या आकाराच्या ५७ बसेस सेवेत सामील होतील, असे सभापती विलास जोशी यांनी सांगितले. त्यामुळे बसचा आकडा ४७८ वर पोहोचणार असल्‍याने ठाण्याच्या रस्त्यावर अधिकच्‍या बसेस धावताना दिसतील. तसेच वाढत्या बससंख्येमुळे परिवहन सेवा ठाणे हद्दीबाहेर देण्यास तत्पर होणार आहे. सध्या १०४ विविध रूटवर धावणाऱ्या ठाणे परिवहनच्‍या बस इतर प्रस्तावित रूटवरदेखील धावू लागतील; तर १५३ गाड्या भंगारात काढल्यानंतर २० सीएनजी बस यांची खरेदी करण्यात आली होती. त्‍यामुळे खर्चाच्‍या ताळेबंदवर देखील समतोल ठेवला जात आहे.

परिवहन सेवेला व्होल्व्होचा भुर्दंड
ठाणे परिवहन सेवेच्या ताब्यात तब्बल ३० वातानुकूलित व्‍होल्‍व्‍हो बसेस आहेत. यातील तीन बसेस या आगारातच पडून आहेत; तर बोरिवली रूटवर चालणाऱ्या बसेस परिवहन सेवेला त्रासदायक ठरत आहे. या गाड्यांच्या मेंटेनन्स आणि दुरुस्तीसाठी महिन्याला मोठा खर्च परिवहन सेवेला सोसावा लागत आहे.

२५ हजार ज्‍येष्ठांना परिवहन सेवेचा लाभ
ठाणे परिवहन सेवेने वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या १६८३ ठाणेकरांना मोफत प्रवासासाठी ओळखपत्र दिले आहे; तर वयाची ६० वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना प्रवास सवलतीत अर्धे तिकीट देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तब्बल २५ हजार ७७६ ज्‍येष्ठ नागरिक हे परिवहन सेवेचा लाभ घेत आहे.
------------------------------------------
नव्या इलेक्ट्रिक बसेसचा समावेश झाल्यानंतर नव्या रूट सुरू करण्यासोबतच पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच सध्याचे प्रतिदिन उत्‍पन्न २५ ते २६ लाखाच्‍या घरात असून ते ३० लाखांपर्यंत नेण्याचा मानस आहे.
- विलास जोशी, परिवहन समिती सभापती
-----------------------------------------
परिवहन सेवेच्या ताफ्यात जुलै महिन्याच्या अखेरीस एकंदर ६७ बसेस सामाविष्ट होणे अपेक्षित आहे. बसेसच्या संख्येत वाढ झाल्यानंतर उत्पन्नात वाढ होणार असून नवीन रूट चालू करण्यात येतील.
- भालचंद्र बेहरे, ठाणे परिवहन व्यवस्थापक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.