रानभाज्यांची पर्वणी

रानभाज्यांची पर्वणी

रानभाज्यांची पर्वणी

अजित शेडगे, माणगाव
जिल्‍ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्‍या सरींची बसरात झाली असून रानावनात झाडा-झुडपांना, वेलींना पालवी फुटू लागली आहे. अशा वातावरणात बाजारात रानभाज्‍यांची आवक वाढली असून औषधोपयोगी म्‍हणून ग्राहकांकडून पसंती मिळत आहे.
पावसाळा सुरू होताच रानभाज्यांना बहर येतो. पावसाळ्यापूर्वी रानात कुडा, शेवळा, आकुर इत्यादी रानभाज्या मोठ्या प्रमाणात उगवतात. या रानभाज्या चविष्ट व पौष्टिक असतात. ठराविक ऋतूत येणाऱ्या या भाज्यांना सध्या खवय्यांकडून मोठी मागणी आहे. आदिवासी महिला रानावनात फिरून या भाज्या मिळवतात. यातून त्‍यांना रोजगार मिळतो.
रानभाज्यांची आवक वाढल्यामुळे अन्य भाज्‍या स्वस्त झाल्या आहेत. महामार्गावर आदिवासी महिला या भाज्‍या विक्रीसाठी घेउन बसतात. प्रवासी तसेच पर्यटक आवर्जून रानभाज्‍या खरेदी करतात. आरोग्‍यदायी तसेच तुलनेने स्‍वस्‍त असल्‍याने अनेकांकडून त्‍या आवर्जून खाल्‍ल्‍या जातात. यंदा पाऊस लांबला तरी रानभाज्‍या मोठ्या प्रमाणात उगवल्या आहेत. अवघ्‍या दहा ते पंधरा रुपयांना जुडी विकली जात असल्‍याचे शांता पवार या विक्रेतीने सांगितले.

पावसाळ्यात रानातील भाज्‍यांना अधिक चवदार असतात. विविध प्रकारचे संस्कार करून त्‍या शिजवल्या जातात. भाजीबरोबर रानपालाही उपयोगात आणला जातो. नैसर्गिक व पौष्टिक असल्याने या हंगामी भाज्‍या आवर्जून खाल्‍ल्‍या जातात.
- शोभा धायगुडे, गृहिणी

.............

ऋतू बदलतात तसे बाजारात रान भाज्या दिसायला लागतात. पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या या रानभाज्या चवीला रुचकर असतात. शिवाय पौष्टिक तसेच औषधीसुद्धा असल्याने पहिल्या पावसाच्या एक-दोन सरी बरसल्या बाजारात पावसाळ्यात मिळणाऱ्या पौष्टिक रानभाज्यांची आवक सुरू होतेय औषधी गुणधर्मामुळे पावसाळी रानभाज्या हा संशोधनाचा विषय आहे. निसर्गाने मुक्त हस्ताने हा अनमोल ठेवा आपल्याला दिला आहे. पण या रानभाज्यांचा आस्वाद घेण्याएेवजी अनेकजण नाक मुरडत असल्याने या भाज्यांचे आरोग्याच्यादृष्टीने असलेले महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे.
--------------------------------------
भारंग ः भारंग भाजी कोवळी असताना तोडतात. याच्या पानांच्या कडा दिसायला करवतीच्या दातांसारख्या असतात. भारंगाची सुकी भाजी विशेष लोकप्रिय आहे. भारंगाचे कोंब व पाने भाजीसाठी काढतात. करवतीसारख्या दातेरी पानांच्या कडा असल्याने याला सिरॅटम् म्हणतात. भारंगाच्या पानामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. गणपतीच्या आगमन काळात झाडाला निळसर जांभळ्या फुलांचे तुरे येतात.
------------------------------------
टाकळा ः टाकळा पावसाळ्यात उगवते. टाकळ्याच्या पानांची भाजी सर्व प्रकारच्या त्वचारोगांवर औषधी म्हणून वापरली जाते. साधारण मेथीच्या भाजीसारखी दिसणारी कोवळी रोपे भाजीसाठी वापरली जातात. टाकळ्याच्या कोवळ्या पानांमधील उष्ण गुणधर्मांमुळे शरीरातील वात व कफदोष कमी होण्यास मदत करते. टाकळ्याच्या बिया वाटून त्वचेवर लेप लावला जातो.
------------------------------------------
कपाळफोडी ः ही वेलवर्गीय वनस्पती पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात येते. कपाळफोडी शेताच्या बांधावर, जंगलात, गावाच्या आजूबाजूला आढळते. तिच्या पानांची भाजी जीर्ण आमवाता खाल्ली जाते. ही भाजी संधिवातात गुणकारी आहे. कपाळफोडीच्या भाजी खाल्ल्याने पोट गच्च होणे, मलाविरोध सारख्या विकारात आराम मिळतो. स्त्रियांची मासिक पाळी नियमित होत नसेल त्यावेळी कपाळफोडी भाजीचा उपयोग होतो.
--------------------------------------------
शेवळा ः शेवळा कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र जंगलात आढळतो. शेवळा म्हणजे सुरणाच्या फुलांची दांडी. पावसाळा सुरू झाला की जमिनीत असलेल्या सुरणाच्या कांद्याला उंच दांडी असलेला फुलोरा येतो. भाजी करण्यासाठी फुलोऱ्याची संपूर्ण दांडी वापरली जाते. शेवळ्यात भरपूर प्रोटिन्स असतात. याच्या ताज्या दांड्यांची भाजी ताबडतोब करावी लागते.
----------------------------------------------
कुलुची भाजी ः पावसाळ्यात पहिली सर बरसल्यापासून कुलुची भाजी जंगलात दिसू लागते. कुलुची भाजी काही दिवसातच तयार होते. या भाजीला फोडशी/कुलु किंवा काल्ला नावाने ओळखले जाते. कुलुची भाजी एक प्रकारचे गवतच असते. कुलुची भाजी फक्त पावसाळ्यात मिळते. कुलु शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारात करता येते.
-----------------------------------------------
कर्टोली ः ही एक फळभाजी असून ती पावसाळ्यात उगवते. कर्टोली दिसायला कारल्यासारखी आणि कडू असतात. कारल्याची भाजीसारखीच कर्टोलीची भाजी केली जाते. कर्टोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व फळे येतात. डोकेदुखीवर कर्टोली उत्तम औषध आहे. या भाजीचे मधुमेहाच्या रुग्णांनी नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
-------------------------------------------------
कुडा ः कुडा हा रानभाज्यांमधला कल्पवृक्ष म्हणावा लागेल. याची पानं ग्रामीण भागात न्याहारीसाठी, गरम पातेली उचलायला या कामांना येतात. कुड्याचं पाळ (मूळ) आजीच्या बटव्यात असतंच. एखाद्याला भूक लागत नसेल, पोटाचे विकार असतील, लहान मुलं जेवायला नको म्हणत किरकिर करत असतील तर कुड्याचं पाळ उगाळून ताकातून प्यायला देतात.
----------------------------------------------
कुटणी ः तपकिरी रंगाच्या मोठ्या पानांचा वेल ही कुटणीची ओळख. सध्या ही कुटणी दुर्मिळ होत चालली आहे. अळूची किंवा रानअळवाची जशी अळवडी केली जाते, त्याच पद्धतीने कुटणीच्या पानांचीही वडी शिजवतात. अत्यंत गुणकारी असलेली ही कुटणी चविष्ट वडीच्या रूपात अनेकांना आवडते.
------------------------------------------
अबय ः पावसाळ्यात तग धरून, पावसाळा संपला तरी थंडीतल्या दवावर टिकून राहणारी वेलवर्गीय रानभाजी म्हणजे अबय. ही भाजी फरसबीच्या कुटुंबातील आहे. कोवळ्या शेंगांची भाजी करतात. गुलमोहोराच्या शेंगेसारखी दणकट असली, तरी अबयची भाजी लोण्यासारखी शिजते.
----------------------------------------
रानअळू ः पाऊस सुरू झाला की आठवडाभरात अनेक ठिकाणी रानअळवाचे कांदे डोकं वर काढतात. यात दोन-चार प्रकार आहेत. पण एक वेगळेपण हे की घरगुती अळू जे मुद्दाम कंद लावून वाढवलं जातं, त्याची बाहेरची पानं वापरली जातात नि मधला सुवरा (कोवळं पान) तसाच ठेवला जातो. पण रान अळवाच्या मधली कोवळी पानं वापरली जातात नी बाजूची जून पानं तशीच ठेवतात.
---------------------------------------------
घोळ ः घोळ भाजीत अनेक पोषकघटक, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि फायबर्स असतात. लो कॅलरीज असणाऱ्या या भाजीत फॅटचे व कोलेस्टेरॉलचे प्रमाण ०% असते. घोळूची भाजी ही एक रानभाजी असून ती बुळबुळीत आणि चवीला थोडी वेगळी लागते. ही भाजी अन्नपचनास मदत करते, यकृताचे कार्य सुधारते.
---------------------------------------------------
दिंडा भाजी ः या भाजीला पावसाळ्याच्या पहिल्या सरीबरोबर नवे कोंब फुटू लागतात. पूर्ण वाढ होण्याआधीच भाजीसाठी तिचे कोंब खुडले जातात. ही भाजी पावसाळा संपला की मृत अवस्थेत जाते.
------------------------------------------
मायाळू भाजी ः याचे वेल अंगणात, बागेमध्ये व कुंडीमध्ये सुद्धा लावता येतात. ही कोकणात सर्वत्र आढळते. मायाळू थंड गुणधर्मी असल्याने पित्तशामक आहे. पचनास हलकी, सांधेदुखीसाठी गुणकारी आहे.
--------------------------------------------------
आघाडा ः आघाडा रोपवर्गीय रानभाजी आहे. ‘अ’ जीवनसत्वाने भरपूर अशी ही भाजी आहे. हाडे बळकट करण्यासाठी आघाडा खावा. आघाडा रक्तवर्धक आहे, पाचक आहे. मुतखडा, मुळव्याध व पोटदुखीवर गुणकारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com