रिक्त पदांमुळे नागरिकांचे कामे खोळंबली

रिक्त पदांमुळे नागरिकांचे कामे खोळंबली

मोखाडा, ता. १८ (बातमीदार) : राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबवून, गतिमान असल्याचा सर्वत्र गवगवा करत आहे. प्रत्यक्षात मात्र सरकारी कार्यालयात कर्मचारी संख्या अपूर्ण असल्याने जनतेची कामे खोळंबत आहेत. नागरिकांना सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहे. त्याचा प्रत्यय मोखाडा तहसीलदार कार्यालयात नागरिकांना येत आहे. केवळ पाच कर्मचाऱ्यांवर मोखाडा तहसीलदार कार्यालयाचा कारभार सुरू आहे. नागरिकांची कामे लवकर व्हावीत, म्हणून भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी या कार्यालयात तातडीने रिक्त पदे भरण्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

मोखाडा तहसीलदार कार्यालयात एकूण १४ मंजूर पदांपैकी सात पदे भरलेली आहेत; तर उर्वरित पदे रिक्त आहेत. या सात पदांपैकी एक महसूल सहायक निलंबित, तर एक कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यालयात केवळ पाच कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांना इतर तीन ते चार कर्मचाऱ्यांचा अधिभार सहन करत कार्यालयीन कामकाज करावे लागते. अन्य विभागांचाही या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. खोडाळा आणि मोखाडा हे दोन मंडळ आहेत. त्यामधील मोखाडा मंडळ अधिकारी दोन महिन्यांपासून गैरहजर आहेत, तर खोडाळा मंडळ अधिकाऱ्यांची बदली झाल्याने सद्यस्थितीत दोन्ही मंडळ अधिकारी पदे रिक्त आहेत. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, म्हणून भाजप मोखाडा तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेत रिक्त पदे भरण्यासाठी निवेदनाद्वारे साकडे घातले आहे.

विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल
शाळा, महाविद्यालयीन शिक्षणासाठी लागणारे दाखले, खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लागणारे दाखले लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी येत असून नागरिकांच्या संतप्त भावनांना युतीच्या पदाधिकाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

कार्यालयात विजेचा लपंडाव
आठवड्याभरापासून तालुक्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. त्याचा मोठा परिणाम तहसीलदार कार्यालयाच्या कामकाजावर झाला आहे. १२ जूनपासून कार्यालयात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ऑनलाईन कामकाजात व्यत्यय येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. जनरेटर अथवा इन्व्हर्टरची व्यवस्था नसल्याने, वीज गेल्यानंतर सर्व कामकाज ठप्प होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com