सार्वजनिक शौचालयात दारूच्या पार्ट्या

सार्वजनिक शौचालयात दारूच्या पार्ट्या

Published on

तुर्भे, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिका हद्दीतील शौचालयांची अवस्था दयनीय झाली आहे. यातील काही शौचालयांमध्ये सफाई कामगाराला राहण्यासाठी दिलेल्या खोलीत दारूच्या पार्ट्या होत असून वाशीत असाच प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गर्दुल्ले, जुगारी, मद्यपींनी शौचालयांच्या छतावर अड्डे बनवले आहेत.
नवी मुंबई महापालिकेने शहरामध्ये पाच हजारांहून अधिक शौचालये बांधली आहेत. या शौचालयांच्या स्वच्छतेसाठी खासगी ठेकेदारांची नेमणूक करण्यात आली आहे. दरवर्षी या शौचालयांवर कोट्यवधीचा खर्च पालिकेकडून करण्यात येतो. मात्र, ठेकेदारांकडून स्वच्छतेसाठी नेमण्यात आलेल्या व्यक्तींकडून शौचालयाचा गैरवापर होताना दिसत आहे. वाशी सेक्टर १ मधील गार्डन शेजारी असणाऱ्या सार्वजनिक शौचालयात परप्रांतीयांकडून अंधार होताच दारूच्या पार्ट्या केल्या जात आहेत. बंद शौचालयांमध्येच दारूच्या पार्ट्या होत असल्याने मनसे वाशी विभागप्रमुख अभिलेश दंडवते यांनी पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. याबाबत वाशी विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त अमित सोडगे यांच्याशी संपर्क साधला असता तो झाला नाही.
-------------------------------
महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्‍नचिन्ह
शौचालयाच्या टेरेसवर गर्दुल्ले दिवसाढवळ्या नशापान करत बसलेले असतात. यावर शौचालयातील कामगार काही बोलल्यास त्याला शिवीगाळ करून मारहाण केली जाते. गावठाण तसेच झोपडपट्टी भागात कामगारांकडून असे प्रकार सर्रास घडतात. मात्र, वाशीसारख्या मध्यवर्ती ठिकाणी पालिकेच्या सार्वजनिक शौचालयात अशा प्रकारे दारूच्या पार्ट्या रंगत असतील तर महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-------------------------------------------
शौचालयाशेजारी गार्डन असल्याने कायम वर्दळ सुरू असते. तिथे अनेकदा जुगाराचे डाव मांडले जातात. त्यामुळे मनपा प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी.
- अभिलेश दंडवते, मनसे विभागप्रमुख, वाशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.