जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष ः कॉ प्रकाश रेड्डी

जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष ः कॉ प्रकाश रेड्डी

Published on

जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष
प्रकाश रेड्डी यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. १८ (बातमीदार) ः स्वातंत्र्याच्या आधी आणि नंतरही मुंबई हे औद्योगिक शहर म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर महाराष्ट्राची राजधानी म्हणून निर्माण झालेल्या या शहराचा पायाभूत विकास व्हावा, यासाठी निर्भीडपणे व अभ्यासपूर्ण भाषणांनी जनमानसावर छाप पाडली अशा दिवंगत कॉम्रेड जयवंत पाटील यांची जन्मशताब्दी प्रभादेवीकर वर्षभर साजरी करणार आहेत. लोकांचा हा व्यक्त होणारा कृतज्ञता भाव म्हणजेच त्यांच्या कार्याला मिळालेली पोचपावती आहे, असे उद्‌गार महाराष्ट्रातील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांनी काढले.
प्रभादेवी येथील आगरी सेवा संघाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, कॉ. जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे लोकांसाठी संघर्ष असलेला तो काळ होता. मुंबईतील मध्यवस्तीतील गिरणगावात झोपडपट्टी, चाळी, गल्लीबोळात जाऊन लोकांसाठी अहोरात्र काम केल्यामुळे जया पाटील, मणिशंकर कवठे, गणाचार्य, प्र. के. कुरणे यांच्यासारखे कार्यकर्ते सातत्याने निवडून येत असत; परंतु ८२ च्या गिरणी संपानंतर मुंबई शहराची ओळख औद्योगिक राजधानीऐवजी आर्थिक राजधानी म्हणून झाली, असे त्‍यांनी या वेळी सांगितले.
जयवंत पाटील यांची कारकीर्द म्हणजे संघर्ष आणि क्रांती या कल्पनांनी झपाटलेला तारुण्याचा तो काळ. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोवामुक्तीचा लढा आणि नंतर झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कम्युनिस्ट पक्षाने जी महत्त्वाची भूमिका पार पाडली त्यामध्ये जयवंत पाटील अग्रभागी होते. १९५७ च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीने जो प्रचंड विजय मिळवला त्यात जयवंत पाटील महापालिकेवर निवडून आल्‍याचे त्‍यांनी या वेळी सांगितले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ कृष्णा ब्रीद, आगरी सेवा संघाचे अध्यक्ष पद्माकर म्हात्रे, कॉ. उदय चौधरी, कॉ. एकनाथ माने, राष्ट्रवादीचे रमेश परब, सुभाष मराठे, मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.