मणिपूरचा हिंसाचार थांबवा

मणिपूरचा हिंसाचार थांबवा

मणिपूरचा हिंसाचार थांबवा
वर्ल्ड मितेई कौन्सिलची पंतप्रधानांकडे मागणी
मुंबादेवी, ता. १८ (बातमीदार) ः मागील दीड महिन्यापेक्षा जास्त काळ मणिपूरमध्ये हिंसाचार पेटला आहे. अत्यंत शांत, सालस आणि निसर्गाचे अद्वितीय सौंदर्य वैभव प्राप्त असलेल्या मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब उसळला आहे. यामागे परकीय दहशतवादी शक्ती कार्यरत असून तिचे अस्तित्व कायमचे संपवायला हवे, असे मत वर्ल्ड मितेई कौन्सिलचे महाराष्ट्र सेक्रेटरी नबकिशोर, बॉलीवूड एक्टरेस लिन लिंशरम, रोहन फिलेम, रिपुंजय आणि नरेशचंद्र लिंशरम यांनी व्यक्‍त केले आहे. शनिवारी (ता. १७) आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात मुंबई उपनगर, नवी मुंबई, विरार आणि राज्याच्या इतर भागांतून आलेल्या मणिपूरवासीयांनी मणिपूर हिंसाचारमुक्त व्हावा, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
आम्ही शांतीप्रिय समाज असून मणिपूर पुन्हा शांत, सुजलाम आणि सुफलाम झालेले आम्हाला पाहायचे आहे, असे बॉलीवूड कलाकार लिन लिंशरम यांनी म्हटले. आंदोलनात हिंसाचार थांबवा, मणिपूरला शांत राहू द्या, लोकांना सुरक्षित जगू द्या, अशा वाक्यांचे फलक आणि तिरंगा राष्ट्रध्वज हाती घेतलेल्या महिला शांतीचा संदेश देत होत्या.
आम्ही महाराष्ट्रात राहणारे मणिपुरी आहोत. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसक घटनांमुळे आमच्या राज्याच्या शांतता, सुरक्षा आणि सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या संघर्षाचे मूळ कारण शेजारील देशातून सशस्त्र आणि नि:शस्त्र अवैध रीतीने घुसखोरी करून आलेले स्थलांतरितांचे लोंढे आहेत. ज्यांच्यामुळे मणिपूरच्या स्थानिक लोकांवर अन्याय, अत्याचार होत असून भौगोलिकदृष्ट्या पूर्वापार भारतीय असलेल्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. हे थांबायला हवे, असे फिलेम रोहन म्हणाले.
मणिपूरचा हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आहे आणि ही भूमी प्रचंड सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहे. या क्षेत्राचा भूगोल विस्कळित करण्याचा प्रयत्न केला जातोय. मणिपूरचा इतिहास, संस्कृती आणि वारसावर हल्ले करण्यात येत आहेत. ते तात्काळ रोखले जावेत, असे मेलोडी खेत्रीमयुगम म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com