आरटीओच्या मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्‍य

आरटीओच्या मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्‍य

Published on

आरटीओच्या मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्‍य
स्थानिकांचे आरोग्य धोक्यात; तक्रारी करूनही कारवाई शून्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेत नागरिकांनी अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या असून त्याठिकाणी बेकायदा काम होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शिवाय येथे कचरा टाकला जात असून, लागूनच असलेल्या आठ सोसायट्यांमधील नागरिकांना कचऱ्याच्या घाणीमुळे दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात स्‍थानिकांनी परिवहन विभागाकडे अनेक वेळा तक्रारी केल्या असून, त्याची दखल घेण्यात आली नसल्याने ऐन पावसाळ्यात या घाणीमुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्‍हणजे या बेकायदा झोपड्यांमध्ये अनधिकृतपणे विद्युत सेवा, पाणी आणि शासनाच्या सर्व सोयी-सुविधा पुरवण्याचे काम केले जात असल्याचा आरोप वात्सल्य हाउसिंग सोसायटीच्या नागरिकांनी केला आहे. आम्ही करदाते असूनही बेकायदा अतिक्रमण करणाऱ्यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. रात्री-अपरात्री या भागातून महिलांच्या ओरडण्याचे आवाज येत असून, अवैध पद्धतीने अतिक्रमणधारकांकडून राजकीय वरदहस्तातून भाडेवसुलीही केली जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

आरटीओकडे तक्रार
अंधेरी आरटीओ अधिकाऱ्यांना यांसदर्भात नुकतीच ९ जूनला लेखी तक्रार दिली आहे; तर वर्सोवा मतदारसंघाच्या आमदार भारती लव्हेकर यांनाही तक्रार केली आहे. मात्र, अद्याप तक्रारीवर कोणतीही कारवाई झाली नसून, बेकायदा झोपड्या, त्यांच्याकडून जमा होत असलेल्‍या कचऱ्याचे ढिगारे आणि अनधिकृतपणे थाटलेली दुकाने अजूनही तशीच उभी आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व सोसायट्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने भविष्यात आरोग्याचा धोका निर्माण झाल्यास आरटीओ प्रशासन जबाबदार राहणार असल्याचे जयश्री पितळे यांनी सांगितले.

सुरक्षा भिंतीला लागून संपूर्ण अनधिकृत बांधकाम झाले आहे. त्याठिकाणी जुगार, अनधिकृतपणे गॅरेज, दारू पितात, शिवीगाळ करतात, ही पूर्ण जागा अंधेरी आरटीओ प्रशासनाच्या मालकीची आहे. उद्या या जागेत कोणताही गंभीर गुन्हा घडल्यास जबाबदार आरटीओ अधिकाऱ्याला पकडावे की नाही, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. या सर्व प्रकाराचा सोसायटीला त्रास आहे. रात्रभर बेकायदा पार्ट्या सुरू राहत असल्याने झोप लागत नाही. झोपड्यांचा कचरा येथेच टाकला जात असल्याने डम्‍पिंग ग्राऊंडसारखा वास येतो.
- संतोष जगताप, सचिव, वात्सल्य सोसायटी

आमच्या बिल्डिंगची पाण्याची टाकी याच सुरक्षा भिंतीला लागून आहे. बेकायदा झोपड्यांतील सांडपाणी पिण्याच्या पाण्यात जाण्याची शक्यता आहे. प्लॉट विकत घेऊन, शासनाला कर भरून आम्ही येथे राहायला आलो आहोत. दुसरीकडे शासनाची जागा असताना त्यावर खुशाल अतिक्रमण होऊ दिले जाते. त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे.
- जयश्री पितळे, रहिवासी वात्सल्य सोसायटी

अंधेरी आरटीओ संदर्भातील जागांवर अतिक्रमण करण्यासंदर्भात कोणतीही तक्रार माझ्याकडे आली नाही. तक्रार असल्यास त्यावर सकारात्मक विचार होईल.
- विवेक भीमनवार, आयुक्त, राज्य परिवहन विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.