सीएसएमटी हेरिटेज म्युझियमचे तिकीट आता ऑनलाईन

सीएसएमटी हेरिटेज म्युझियमचे तिकीट आता ऑनलाईन

सीएसएमटी हेरिटेज म्युझियमचे तिकीट आता ऑनलाईन
घरबसल्‍या ‘बुक माय शो’वरून खरेदी करता येणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : आधुनिक काळातील स्थापत्यशैलीचा अद्‍भुत नमुना अशी ओळख असणाऱ्या सीएसएमटी इमारत ही जगातील सर्वात आश्चर्यकारक स्थानकांपैकी एक स्थानक आहे. दररोज हजारो पर्यटक या इमारतीला आणि इमारतील हेरिटेज म्युझियमला भेट देतात. सध्या हेरिटेज म्युझियम तिकीट विक्री मॅन्युअल पद्धतीने केली जाते. मात्र लवकरच पर्यटकांना ‘बुक माय शो’वरून ऑनलाईन पद्धतीने सीएसएमटी हेरिटेज वॉक आणि हेरिटेज म्युझियमची तिकीट खरेदी करता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आशिया खंडातील पहिली रेल्वे गाडी बोरीबंदर स्थानकातून धावली, ते आताचे सीएसएमटी रेल्वेस्थानक म्हणून नावारूपाला आले आहे. पूर्वीचे बोरीबंदर ते आताचे सीएसएमटी स्थानक असा बदललेला १६९ वर्षांचा इतिहासाचा मध्य रेल्वेने हेरिटेज म्युझियममध्ये ठेवला आहे. भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारे हेरिटेज म्युझियमला दररोज हजारो पर्यटक आणि विद्यार्थी भेट देतात. विशेष म्हणजे हेरिटेज म्युझियमला भेट देणाऱ्यांमध्ये विदेशी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या हेरिटेज म्युझियम तिकीट विक्री मॅन्युअल पद्धतीने केली जाते. तसेच सोमवार ते शुक्रवार दुपारी २ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत तिकीट विक्री केली जाते. त्यामुळे पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. आता रेल्वे प्रवासी आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी ‘बुक माय शो’वरून तिकीट खरेदीची सोय उपलब्‍ध करून दिली आहे.

खासगी कंपनीशी करार
मध्य रेल्वेने सीएसएमटी हेरिटेज इमारत येथे हेरिटेज टूरचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्याच्या पर्यटन क्षेत्रातील एका खासगी कंपनीशी पाच वर्षांसाठी करार केला आहे. बुक माय शोद्वारे सीएसएमटीचा हेरिटेज वॉक आणि हेरिटेज म्युझियमची तिकिटे ऑनलाईन बुक करता येणार आहेत. परवानाधारकांना पर्यटकांचे स्वागत आणि आवश्यक पास जारी करणे, ओळखपत्र आणि मार्गदर्शन यांसारख्या उद्देशांसाठी रिसेप्शन किऑस्क उभारण्याची परवानगी दिली जाणार आहे.

ही असतील भेटीची ठिकाणे
मेनलाईन कॉन्कोर्स, वर्ल्ड हेरिटेज बिल्डिंग, स्टार चेंबर, स्टार चेंबरजवळील हेरिटेज गॅलरी, रेल्वे संग्रहालय आणि सेंट्रल डोममधील स्मारक या ठिकाणांचा यामध्ये समोवश असणार आहे. पर्यटक बसेसना परवानाधारकाच्या रिसेप्शन किऑस्कजवळ पर्यटकांना सोडण्याची आणि परत घेऊन जाण्याची परवानगी असणार आहे. हेरिटेज साईटमधील सर्व परवानगी असलेल्या ठिकाणी भेट देण्याच्या ठिकाणांचे छायाचित्रण करण्याची परवानगी असेल. मात्र, व्हिडीओग्राफी करण्यास मनाई आहे.

असे असेल शुल्क
१५० रुपये प्रति विद्यार्थी
५०० रुपये प्रति व्यक्ती

काय आहे हेरिटेज म्युझियममध्ये ?
पर्यटकांना रेल्वेचा इतिहास सांगणारी माहिती हेरिटेज म्युझियमध्ये आहे. जुने फोटो, इमारतीचा आराखडा, रेल्वेच्या छोट्या इंजिनांसह अन्य वस्तू आहेत. १८५३ साली मुंबई ते ठाणे या मार्गावर पहिली रेल्वे धावली तेव्हापासून रेल्वेमध्ये अनेक बदल झाले. रेल्वे गाड्यांचे डबे, इंजिन यात बदल होत गेले. १९२५ मध्ये पहिली विजेवर धावणारी रेल्वे सुरू झाली. ही सगळी ऐतिहासिक चित्रे या हेरिटेज म्युझियममध्ये आहेत. ब्रिटिश काळापासून असलेली कागदपत्रे, रेल्वे गाड्यांचे मॉडेल, जुनी छायाचित्रे यांच्या रूपात आपल्याला रेल्वेचा इतिहास पाहता येतो. जुन्या छायाचित्रांमध्ये पूर्वीच्याकाळी वापरण्यात आलेले टेलिफोन, संदेश वाहनाचे मोर्स यंत्र, भांडी, कंदील, अधिकाऱ्यांचे बॅच, इंजिन आणि डब्यावरील लोगो, जुने तिकीट हा खजिनाही येथे जतन करून ठेवण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com