आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी

आयुक्तांकडून नालेसफाईची पाहणी

उल्हासनगर, ता, ३ (वार्ताहर) : भर पावसात महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी नालेसफाईची पाहणी केली. यावेळी पाण्याच्या प्रवाहास अडथळा ठरणारी नाल्याशेजारील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी चारही प्रभागात रात्रपाळीसाठी टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तात्काळ,वेळोवेळी कार्यक्षेत्रात उपस्थित राहून आपत्तीच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
.....
के व्हिला पूल वाहतुकीसाठी खुला
ठाणे (बातमीदार) : हॉली क्रॉस शाळा ते सेंट्रल मैदान या मोक्याच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून दिलासा देणारा के व्हिला येथील पूल शनिवारपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे, मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी दूर होणार आहे. त्यासह, पावसाळ्यात कचरा साठून कायम तुंबणारा नाल्याचा मार्गही मोकळा झाला आहे. पावसाळ्यात उद्‌भवणारी पूर परिस्थिती आणि वाहतूक कोंडीची बाब लक्षात घेऊन राबोडीतील के व्हिला येथील नाल्यावरील पुलाचे बांधकाम करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला होता. तसेच हे काम जलद पूर्ण करण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार, ठाणे महानगरपालिकेने जानेवारी महिन्यात नाल्यावरील पूल रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते.
.....
‘त्या’ रेल्वे प्रवाशांवर कारवाई करावी
अंबरनाथ (बातमीदार) : सकाळी गर्दीच्या वेळी लोकलमध्ये बसण्यासाठी जागा मिळावी म्हणून उल्हासनगरहून बसून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांमुळे अंबरनाथच्या प्रवाशांना प्रवास करणे त्रासदायक होत आहे. त्यामुळे अशा प्रवाशांवर कारवाईची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. अंबरनाथ स्थानकातून सीएसएमटीसाठी सकाळी ७.१७, ७.३५, ८.१०, ८.२७ आणि ८.४९ वाजता सुटणाऱ्या लोकलमध्ये जागा मिळावी यासाठी बहुतांशी प्रवासी विठ्ठलवाडी आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकातून अंबरनाथला उलटे बसून येतात. त्यामुळे अंबरनाथमधील रेल्वे प्रवाशांना बसायला जागाच मिळत नाही. त्यामुळे अंबरनाथला उलटे बसून येणाऱ्या प्रवाश्यांवर कारवाईची मागणी करणारे निवेदन मनसेच्या वतीने अंबरनाथ रेल्वे स्थानक प्रमुख तसेच आरपीएफ अधिकाऱ्यांना देण्यात आले. अशा प्रवाशांना अंबरनाथ रेल्वे स्थानकात उतरवून त्यांच्यावर रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा मनसेतर्फे देण्यात आला.
....
केडीएमरीत सोमवारी जनता दरबार
डोंबिवली : नागरिकांच्या तक्रारी प्रभाग स्तरावर मार्गी लावण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणि पारदर्शकता आणण्यासाठी कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाने दर सोमवारी जनता दरबार घेण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांचे नागरी समस्यांसंदर्भातचे प्रश्न ते राहत असलेल्या प्रभाग स्तरावर मार्गी लागले पाहिजेत यासाठी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जनता दरबार घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विविध भागात राहणाऱ्या नागरिकांचा कल्याण येथे येण्याचा त्रास यामुळे वाचणार आहे. कल्याण मध्ये पालिका मुख्यालयात परिमंडळ एक उपायुक्त धैर्यशील जाधव, डोंबिवलीत पालिका विभागीय कार्यालयात स्वाती देशपांडे यांच्या अधिपत्याखाली जनता दरबार होणार आहेत. दर सोमवारी दुपारी तीन ते पाच वाजताच्या कालावधीत जनता दरबार होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com