मच्छी व्यवसाय संकुलाचे काम संथगतीने

मच्छी व्यवसाय संकुलाचे काम संथगतीने

Published on

अलिबाग, ता. ३ (बातमीदार) : समुद्रकिनारी राहणाऱ्या मच्छीमारांसह कोळी समाजाचा आर्थिक विकास साधण्याबरोबरच शहरातील पर्यटन वाढीला चालना देण्यासाठी अलिबाग शहरामध्ये मच्छी व्यवसाय संकुल उभारले जाणार आहे. या संकुलाचे काम गेल्या आठ वर्षापासून सुरु आहे. संथगतीने सुरु असलेल्या या कामामुळे जिल्ह्यातील मच्छीमारांना या संकुलाची अजूनही प्रतिक्षाच आहे.

रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना आधुनिक पध्दतीने मासेमारीची धडे मिळावे, त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा, त्यांचा आर्थिक व सामाजिक विकास व्हावा, पर्यटन वाढीला चालना मिळावी, यासाठी अलिबाग येथील कोळीवाड्याजवळच राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत मच्छी व्यवसाय संकुलाच्या उभारणीसाठी दोन कोटी ८१ लाख ९५ हजार रुपयांचा निधी गेल्या आठ वर्षापुर्वी मंजूर करण्यात आला. त्यापैकी एक कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधकामासाठी वर्ग करण्यात आला. ८५६ चौरस मीटर क्षेत्रातील या मच्छी व्यवसाय संकुलामध्ये मच्छी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, अद्ययावत असे मत्स्यालय, संग्रहालय, वाचनालय कम सभागृह तसेच प्रशिक्षणार्थींसाठी वसतीगृह, मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालय असणार आहे. २०१५ पासून या संकुलाचे बांधकाम सुरु आहे. आठ वर्षे होत आली, तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या संकुलाचे काम पुर्ण झाले नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संकुलाचे काम संथ गतीने सुरू असल्याचा फटका मच्छीमारांना बसत आहे. पर्यटकांसह मच्छीमारांना संग्रालय, मत्स्यालयाद्वारे मासळी बघण्याचा व त्यांची माहिती संकलीत करण्याते धडे कधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.
----------------------------
तीन कोटी ३६ लाख रुपयांचा निधी वितरीत
मच्छी व्यवसाय संकुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला सुरुवातीला १ कोटी त्यानंतर सप्टेंबर २०२२मध्ये २ कोटी ३६ लाख म्हणजे एकूण तीन कोटी३६ लाख रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. महिन्याभरात काम पुर्ण करून देण्याचे आश्‍वासन देण्यात आले असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग रायगडकडून देण्यात आली आहे.
-------------------
अलिबागमधील मच्छी व्यवसाय संकुल उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. निधीही उपलब्ध झाला आहे. संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. खिडक्या, फिनिशींगची कामे सुरू आहेत. दीड ते दोन महिन्यात हे काम पुर्ण होईल.
- जे. ई. सुखदेवे, कार्यकारी अभियंता , अलिबाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.