रुग्णालयीन स्वच्छतेसाठी कसून प्रयत्न करणार- अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे आश्वासन

रुग्णालयीन स्वच्छतेसाठी कसून प्रयत्न करणार- अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे आश्वासन

रुग्णालयीन स्वच्छतेवर भर
अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांचे आश्वासन

भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : पावसाळी आजारांच्या तोंडावर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेल्या डॉ. सुधाकर शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात रुग्णालयीन स्वच्छतेसाठी कसून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ‘सकाळ’शी बोलताना दिले आहेत. पावसाळ्यात डोके वर काढणाऱ्या आजारांशी लढण्याची तयारीही पालिकेने केल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
पदभार स्वीकारल्यावर अतिरिक्त आयुक्तांनी पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये आणि प्रसूती केंद्रांची, आरोग्य केंद्रांची पाहणी केली. रुग्णालयांमध्ये स्वच्छता हा मुद्दा कायम कळीचा राहिल्याने त्यावर जास्तीत जास्त प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी कबूल केले. रुग्णालयांची स्वच्छता, सुरक्षा आणि शिस्त या गोष्टींकडे प्राधान्य देणार असून त्यासंबंधित केल्या जाणाऱ्या उपाययोजनांसाठी बैठकही घेण्यात आली असल्‍याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

रुग्णालयांच्या स्वच्छतेसाठी काय करणार?
मुंबई महापालिका अखत्यारित रुग्णालयांमध्ये चांगले सकारात्मक बदल दिसून येत आहेत. तरीही स्वच्छता यंत्रणेत मात्र काही दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी बदल सुचवण्यात आले आहेत. यातून चांगला परिणाम दिसून येत आहे. मात्र, स्वच्छतेला शेड्युल तसेच मॉनिटर कसे करता येईल, याचे प्रयत्न सुरू आहेत. भेटीदरम्यान जागांचा प्रश्न, उपकरणांची स्थिती, मनुष्यबळाची कमतरता, तर काही अन्य बाबी निदर्शनास आल्या आहेत. बऱ्याच रुग्णालयांमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू आहे. या अडचणी समजून घेऊन मॉनिटरींगचे काम करावे लागेल, असेही डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

पावसाळी आजारांसंबंधी उपाययोजना काय?
आतापर्यंत पावसाळ्यात सक्रियपणे आणि वेगाने चाचण्या केल्या जात नव्हत्या. मात्र, पावसाळी आजारांसंदर्भात सक्रियपणे चाचण्या करणे आणि आजारांचे निदान योग्यरित्या होणे आवश्यक आहे. त्यामुळे चाचण्या वाढवण्यास सांगितल्या असून रुग्णसंख्या वाढल्यास लोकांनी घाबरू नये. रुग्णसंख्या वाढली की पालिका काही काम करत नसल्याचे निदर्शनास येते. मात्र रोग वाढल्यास काम न केल्याची टीका होईल. मात्र त्यासाठी चिंता नको. उलटपक्षी तपासण्या वाढवल्यास कौतुक करण्यात येईल, पण आता ही परिस्थिती बदलेल. चाचणीसाठी लागणारे किट्स, रॅपिड टेस्ट, अँटिजेन किट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे आम्ही चाचण्यांवर भर देणार असून रुग्णसंख्या निदान कक्ष ही वाढले आहेत.

सर्व आरोग्य अधिकाऱ्यांचा सहभाग?
पालिकेने पावसाळी आजारांच्या ट्रॅकसाठी कोविड अनुभवाचा आधार घेण्याचे ठरवले आहे. कोविड वॉर रूम, शोध मोहीम, घरोघरी जाऊन तपासण्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. एक ते दीड महिन्यात प्रत्यक्षात अॅक्शन ऑफ प्लॅन तयार होईल. एका सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती अपडेट करता येईल. पालिकेच्या पातळीवर एक सॉफ्टवेअर तयार केले जाईल. पावसाळी आजारांसंदर्भात सर्वच पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचा सहभाग हवा आहे.

रखडलेल्या प्रकल्पांचे काम कुठपर्यंत?
पालिका रुग्णालयांचे अनेक प्रकल्प रखडले असून त्यांची माहिती संबंधित रुग्णालयांकडून घेण्यात आली आहे. त्या प्रकल्पांना योग्यरित्या आणि लक्षपूर्वक हाताळणार असून सीपीडी विभागाची ही गेल्या आठवड्यात बैठक घेण्यात आली. या महिन्याच्या शेवटी त्या प्रकल्पांची गती कळेल. नायर रुग्णालयाचे एमआरआय मशीन, सिटी स्कॅन आणि इतर उपकरणांच्या बाबतीत ही चर्चा झाली आहे. या महिन्यांपर्यंत टेंडर निघाले की प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.
...................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com