मनोर- वाडा रस्त्याची दुरवस्था

मनोर- वाडा रस्त्याची दुरवस्था

Published on

मनोर, ता. ६ (बातमीदार) ः पालघर तालुक्याच्या हद्दीत मनोर-वाडा रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. महामार्गालगत टेन नाक्यावरील उतारावर मनोर बाजूकडील रस्‍त्‍यावर जीवघेणा खड्डा पडला असून खड्ड्यात वाहने आदळून नादुरुस्त होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्‍याने रोष व्‍यक्‍त करण्यात येत आहे. त्‍यामुळे वाहनचालकांची गैरसोय दूर करण्यासाठी खड्डे बुजवण्याची मागणी केली जात आहे.
मनोर-वाडा भिवंडी रस्त्याची ओळख खड्ड्यांचा रस्ता म्हणून होत आहे. येथील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. त्‍यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामात होत असलेल्या हलगर्जीपणामुळे काही वर्षांपूर्वी येथील सुप्रीम इन्फ्रा कंपनीकडून सदरील दुरुस्‍तीचा ठेका रद्द करण्यात आला होता. राज्य सरकारने या रस्‍त्‍याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केली होती.
यंदाचा पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनोर-वाडा भिवंडी रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मोठा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र पावसाळा सुरू होताच रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडून चाळण झाली आहे. खड्ड्यांमधून वाट काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहनांचा वेग मंदावल्याने इंधनाच्या खर्चात वाढ होत असल्‍याचे वाहनचालकांकडून सांगण्यात येत आहे. खड्ड्यांमध्ये आदळून अवजड वाहनांचे टायर पंक्चर होणे आणि अन्य दुरुस्तीच्या कामांमध्ये वाढ होऊन वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. दरम्यान, खड्डे बुजवण्याच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून केला जात आहे.

चौकट
टेन नाक्‍यावरील भलामोठा खड्डा ठरतोय धोकादायक
महामार्गाला जोडला जाणाऱ्या टेन गावच्या हद्दीतील उतारावर भलामोठा खड्डा पडला आहे. याठिकाणी दरवर्षी खड्डे पडत असूनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जात नाहीत. रात्रीच्या वेळी टेन नाक्यालगतच्या खड्ड्यात अवजड वाहने आदळत आहेत. त्यामुळे वाहनांचे टायर फुटणे आणि वाहने नादुरुस्त होणे असे प्रकार घडत आहेत. शिवाय एखादा मोठा अपघात होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
.........................
प्रतिक्रिया
टेन नाक्यालगत भलामोठा खड्डा पडला असून खड्ड्यात वाहने आदळून वाहनांचे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. येथील टेन नाका ते देहरजा नदीपर्यंतचे खड्डे तत्काळ बुजवून दरवर्षी पडणाऱ्या खड्ड्यांसाठी कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत.
- जबी राऊत, सामाजिक कार्यकर्ता, ग्रामस्थ टेन
.....................
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनोर ते वाडा दरम्‍यानच्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. टेन नाक्यालगतचा खड्डा पेव्हर ब्लॉकचा वापर करून तत्काळ बुजवण्यात येईल. मनोर-वाडा रस्त्याच्या खड्ड्यांच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
- दत्तू गीते, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भिवंडी उपविभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.