शाळेच्या फी वाढीविरोधात आमदार गायकवाड आक्रमक

शाळेच्या फी वाढीविरोधात आमदार गायकवाड आक्रमक

Published on

उल्हासनगर, ता. ६ (वार्ताहर) : उल्हासनगरमधील न्यू इंग्लिश शाळेने साडेचार हजारांवरून तब्बल १५ हजार रुपयांची भरमासाठ फी वाढ केली आहे. या फी वाढीविरोधात आमदार गणपत गायकवाड यांनी आक्रमक पवित्रा घेत शाळेला भेट दिली. तसेच शाळा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी शाळा प्रशासनाने असभ्य वर्तन केल्याने प्रशासनाला आमदार गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. मात्र पोलिसांनी मध्यस्थी केल्याने हा वाद मिटला.

शाळा सुरू होऊन फक्त महिनाच झाला आहे, मात्र उल्हासनगर कॅम्प नंबर ४ मधील न्यू इंग्लिश या शाळेने पालकांना कोणतीही पूर्वसूचना न देता साडेचार हजारांवरून पंधरा हजार रुपये फी वाढ केली. या प्रकाराने संतापलेल्या पालकांनी सोमवारी शाळेसमोर आपला रोष व्यक्त केला. मात्र शाळा प्रशासनाने पालकांच्या कोणत्याही विनंतीला दाद दिली नव्हती. अखेर आमदार गणपत गायकवाड यांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी बुधवारी सकाळी आपल्या समर्थक आणि पालकांसह शाळेवर धडक दिली. यावेळी उपस्थित शाळेमधील एका महिला शिक्षिकेने आमदार गणपत गायकवाड यांच्यासोबत उद्धट भाषेत बोलून असभ्य वर्तन केले. यामुळे संतापलेल्या आमदार गणपत गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांनी शाळेच्या शिक्षिकेला चांगलेच धारेवर धरले. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला.

शिक्षिकेचे असभ्य वर्तन
दरम्यान, शाळेतील फी वाढ रद्द करावी, यासाठी शाळेला अवधी दिला आहे. शाळा प्रशासन आणि पालकांनी बैठक घेऊन याबाबत तोडगा काढावा. तसेच शाळेच्या असभ्य गैरवर्तणुकीबाबत ठाणे शिक्षणाधीकाऱ्यांना भेटणार असल्याची प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. यावेळी भाजपचे पदाधिकारी नीलेश बोबडे, सुनील तांबेकर, मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप गोडसे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.