पालिकेच्‍या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्‍ती नियमबाह्य

पालिकेच्‍या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्‍ती नियमबाह्य

Published on

विरार, ता. ६ (बातमीदार) ः वसई-विरार महापालिकेच्या मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांची नियुक्ती नियमबाह्य असून; त्यांच्या नियुक्तीदरम्यान त्यांनी पालिकेची फसवणूक केली आहे, असे गंभीर निरीक्षण वसई शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पालघर जिल्हा सचिव ॲड. अनिल चव्हाण यांनी नोंदवले आहे.
वसई-विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाकरिता ५ जून २०१३ रोजी वैद्यकीय अधिकारी पदाकरिता उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. या मुलाखतीला डॉ. भक्ती चौधरी उपस्थित होत्या. त्यांनी या पदासाठी मुलाखतही दिलेली आहे. मुलाखतीवेळी उमेदवाराने शैक्षणिक अर्हता, अनुभव व मेडिकल कौन्सिलकडील आपल्या नोंदणीची सर्व कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. विशेष म्हणजे या वेळी महाराष्ट्र व इंडियन मेडिकल कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र असणे अनिवार्य असते; परंतु ५ जून २०१३ रोजीच्या मुलाखतीदरम्यान भक्ती चौधरी यांच्याकडे दोन्हीपैकी कोणतेही प्रमाणपत्र उपलब्ध नसतानाही त्यांची वैद्यकीय आरोग्य अधिकारी या पदावर निवड करण्यात आली होती, असे निरीक्षण ॲ. अनिल चव्हाण यांनी नोंदवत चौधरी यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.
डॉ. भक्ती चौधरी यांची नोंदणी २५ जून २०१३ रोजीची दाखवत असताना त्यांना कोणत्या निकषावर पालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यात आले, असा सवाल करत ॲड. अनिल चव्हाण यांनी चौधरी यांच्या चौकशीची मागणी केली आहे. इंडियन मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी असली तरी महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय व्यवसाय, नोकरी अथवा उच्च शिक्षण घेण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्येही नोंदणी असणे आवश्यक ठरते; अन्यथा नियुक्ती ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. डॉ. भक्ती चौधरी या प्रथम मुलाखतीच्या दिवशी कोणत्याही वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत आढळत नसल्‍याचे चव्‍हाण यांनी सांगितले. त्‍यामुळे डॉ. भक्ती चौधरी वसई-विरार शहर महानगपालिकेत ऑगस्ट २०१३ ते फेब्रुवारी २०१६ या कालावधीत झालेल्या सर्व मुलाखतींना पात्र नसतानासुद्धा त्यांची बेकायदा नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्‍यामुळे निवड समिती सदस्यांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ॲड. अनिल चव्हाण यांनी केली आहे.
========================================
डॉ. भक्ती चौधरी यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल अधिनियमानुसार फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
- ॲड अनिल चव्हाण, पालघर जिल्हा सचिव, शिवसेना.
==============================================
माझी निवड ही तत्कालीन निवड समितीने केलेली आहे. त्यांनी ती विचारपूर्वक केलेली असावी. माझ्या नोंदणी पत्रासंबंधी मी तत्कालीन आयुक्तांशी पत्रव्यवहारही केलेला आहे. आस्थापना विभागात यासंदर्भातील कागदपत्रे उपलब्ध आहेत. माझ्या नियुक्तीवर नाहक प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे.
- डॉ. भक्ती चौधरी, मुख्य वैद्यकीय, आरोग्य अधिकारी, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.