क्षयरोग निर्मूलनासाठी मुंबई महानगरात मिरा-भाईंदर पॅटर्न

क्षयरोग निर्मूलनासाठी मुंबई महानगरात मिरा-भाईंदर पॅटर्न

Published on

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने राबवलेल्या उपाययोजनांची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण मुंबई महानगर (एमएमआर) क्षेत्रात मिरा-भाईंदर पॅटर्न राबविण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महापालिकेच्या आरोग्य विभागाने एमएमआर क्षेत्रातील महापालिकांना क्षयरोग निर्मूलनाचे नुकतेच धडे दिले.
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी सरकारी क्षेत्रासोबतच खासगी क्षेत्राचाही सहभाग असणे आवश्यक आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर महापालिकेने क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यासाठी सरकारी रुग्णालये व दवाखान्यांसोबतच खासगी रुग्णालये व दवाखान्यांवरही लक्ष केंद्रित केले. खासगी क्षेत्रासाठी प्रभावी उपाययोजना राबविल्यामुळे गेल्या वर्षी महापालिकेने या क्षेत्रातील क्षयरोगाचे निदान होण्याचे १०७ टक्के प्रमाण साध्य केले होते. त्यामुळे गेल्या वर्षी शासनाने दिलेल्या उद्दिष्टामध्ये ९५.५२ टक्के गुण मिळवून मिरा-भाईंदरने पहिला क्रमांक पटकावला होता. या वर्षी देखील जानेवारी ते मे पर्यंत महापालिकेने ८७.८६ टक्के गुण मिळवत पहिल्या क्रमांकावरील घोडदौड सुरूच ठेवली आहे. याची दखल घेत राज्य सरकारने संपूर्ण एमएमआर क्षेत्राला मिरा-भाईंदरने क्षयरोग निर्मूलनासाठी राबवलेल्या उपाययोजनांचा अवलंब करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.
या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मिरा-भाईंदर महानगरपालिकेने ठाणे व पालघर जिल्ह्यातील महापालिका तसेच ग्रामीण भागातील क्षयरोग निर्मूलन अधिकाऱ्‍यांसाठी नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. क्षयरोग निर्मूलनासाठी खासगी क्षेत्राचा सहभाग कसा वाढवता येईल, याबाबत डॉ. पानपट्टे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी महापालिकेचे शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बालनाथ चकोर, तसेच राज्य सरकारचे व जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार उपस्थित होते.

असा आहे मिरा-भाईंदर पॅटर्न
शहरात सुमारे आठशे खासगी रुग्णालये व दवाखाने, तसेच १३४ औषध विक्री दुकाने आहेत. या सर्वांना महापालिकेने क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात समाविष्ट करून घेतले आहे. यापैकी कोणाकडेही क्षयरोगाचा रुग्ण आला की संबंधितांनी त्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला द्यायची आहे, त्या बदल्यात त्यांना महापालिकेकडून प्रत्येक रुग्णामागे ५०० रुपये दिले जातात, शिवाय हा रुग्ण बरा झाला की त्यांना आणखी ५०० रुपये दिले जातात. त्यामुळे खासगी क्षेत्राकडून क्षयरोग रुग्णांबाबत जास्तीत जास्त माहिती मिळत आहे. याशिवाय शहरातील औद्योगिक वसाहतींमध्येही महापालिका नियमित सर्वेक्षण करते व त्या परिसरात शिबिरांद्वारे रुग्णांवर उपचार केले जातात, अशी माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.