विद्युत शॉक लागलेल्या मुलीचे तरुणांनी वाचवले प्राण

विद्युत शॉक लागलेल्या मुलीचे तरुणांनी वाचवले प्राण

Published on

पालघर, ता. ६ (बातमीदार) ः माहीम येथे विद्युत शॉक लागलेल्‍या मुलीची प्रसंगावधान दाखवून दोन तरुणांकडून प्राण वाचविण्यात आले आहेत. या मुलीला तत्‍काळ जवळील रुग्णालयात दाखल केल्‍याने तिच्‍यावर उपचार झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्रिशा मेहेर असे या अपघातग्रस्‍त मुलीचे नाव आहे, तर सुहास म्‍हात्रे आणि चैतन्‍य वर्तक अशी त्या मुलीचा जीव वाचविणारांची नावे आहेत.
माहीम टेंभी भागातील तिसरीत शिकणारी त्रिशा मेहेर ही बुधावारी दुपारी साडेतीनच्या सुमारास माहीम फणस भाट येथे शिकवणीसाठी जात होती. यावेळी खारोडी आणि फणस भात दरम्यान विद्युत वाहिनी तुटून पडली होती. त्यावर तिचा पाय पडल्याने तिला विजेचा जोरदार शॉक लागला. यावेळी तिच्यासोबत असणाऱ्या अन्य सहकाऱ्यांनी तेथून पळ काढला.
याच दरम्यान जवळच्या वाडीत काम करणाऱ्या महिला कामगार भारती मसे हिच्‍या सदरील प्रकार निदर्शनास येताच तिने तेथे राहत असलेल्या सुहास म्हात्रे याला मदतीसाठी बोलाविले. त्‍याने घटनेचे गांभीर्य पाहून जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील फ्यूज काढले व या लहान मुलीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्‍यान, सुहास सोबत असलेल्या चैतन्य वर्तक याच्या मदतीने माहीम येथील एका खाजगी दवाखान्यात जाऊन तिला प्रथम उपचार दिले व नंतर माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल करण्यात आले. दरम्यान, या मुलीची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दीप्ती गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, प्रसंगावधान दाखवून या मुलीचे प्राण वाचवणाऱ्या सुहास म्हात्रे व चैतन्य वर्तक यांचे कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.