मिरा-भाईंदर राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत

मिरा-भाईंदर राष्ट्रवादी अजित पवार यांच्यासोबत

Published on

भाईंदर, ता. ६ (बातमीदार) : मिरा-भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसमधील बहुतांश पदाधिकारी अजित पवार गटात सामील झाले आहेत. अल्पसंख्याक सेलच्या जिल्हाध्यक्षांनी मात्र शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर मिरा-भाईंदर राष्ट्रवादी कोणासोबत जाणार, याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. अजित पवार यांनी ज्या दिवशी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्याच दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव आसिफ शेख यांनी अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यापाठोपाठ मिरा-भाईंदर राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष अनु पाटीलदेखील अजित पवार गटात सहभागी झाल्या. मिरा-भाईंदरचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण कदम यांनीदेखील अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना आपले समर्थन दिले. राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष मोहन पाटील मात्र दोलायमान स्थितीत होते; मात्र कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर तेदेखील बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष साजिद पटेल यांच्यासह अजित पावर गटात सामील झाले. आतापर्यंत अजित पवार गटात सहभागी झालेले सर्व पदाधिकारी हे आनंद परांजपे यांच्या संपर्कातील पदाधिकारी आहेत.
राष्ट्रवादीचे मिरा-भाईंदरमधील आणखी एक प्रदेश सचिव अकंश मालुसरे व अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष गुलाम नबी फारुकी यांनी मात्र राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पावर हे धर्मनिरपेक्ष विचारांचे असल्यामुळे आपण त्यांच्यासोबत असल्याचे फारुकी यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.