पायाळू बाळाचा रुग्णवाहिकेत सुखरुप जन्म

पायाळू बाळाचा रुग्णवाहिकेत सुखरुप जन्म

Published on

वज्रेश्वरी/ वाडा, ता. ६ (बातमीदार) : गर्भाशयात आडवे आलेल्या बाळाला शस्त्रक्रियेद्वारेच सुखरूप बाहेर काढले जाते; मात्र अचानक आठव्या महिन्यातच प्रसववेदना सुरू झालेल्या गर्भवतीची रुग्णवाहिकेतच यशस्वी प्रसूती झाल्याची घटना अंबाडी नाका येथे गुरुवारी (ता. ६) घडली आहे. त्यानंतर आई व बाळाला वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आई व बाळ सुखरूप असल्याचे वाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दसरे यांनी सांगितले.
गुरुवारी पहाटेच्या सुमारास वाडा ग्रामीण रुग्णालयातील पूजा पंकज गिंबल (वय २१) हिला प्रसूतीसाठी ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे पाठवण्यात होते. पूजाच्या आठव्या महिन्याच्या सोनोग्राफीच्या तपासणीमध्ये पोटातील बाळ आडवे असल्याचे निष्पन्न झाले होते. बाळ आडवे किंवा पायाळू असल्यानंतर ते शस्त्रक्रिया करून बाहेर काढावे लागते. त्यामुळे पूजाला ठाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालय येथे प्रसूतीसाठी पाठवण्यात आले होते. रुग्णवाहिकेतील डॉ. सुशील जाधव हे पूजाला १०८ रुग्णवाहिकेत घेऊन ठाण्याच्या दिशेने निघाले. दरम्यान, अंबाडी नाका या ठिकाणी रुग्णवाहिका आल्यावर पूजाला असह्य प्रसूती वेदना सुरू झाल्या. त्या वेळेस चालक नीलेश मोरे यांनी रुग्णवाहिका अंबाडी रस्त्याच्या बाजूला उभी केली. डॉ. सुशील जाधव यांनी शर्थीचे प्रयत्न करून रुग्णवाहिकेतच पूजाची यशस्वी प्रसूती केली. त्यानंतर आई व बाळाला पुन्हा वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. आई व बाळ सुखरूप असल्याचे या वेळी वाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. दसरे यांनी सांगितले.

--------------------
वाडा ते ठाणे हे अंतर साधारणतः ६८ किलोमीटर आहे. त्यात वाहतूककोंडी, रस्त्यावरील खड्ड्यांचा सामना करत १०८ रुग्णवाहिका रुग्णाला रुग्णालयात पोहचवत असते. गर्भवती माता प्रसूतीसाठी ठाणे येथे घेऊन जाताना अनेकदा रुग्णावाहिकेत महिला प्रसूत होत असते. रुग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर असल्यामुळे हे सगळे शक्य होत आहे; अन्यथा गर्भवती मातेच्या किंवा बाळाच्या जीवावर बेतण्याचे प्रसंग ओढवले असते.
- मिलिंद कांबळे, सहायक जिल्हा व्यवस्थापक, ठाणे-पालघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.