निवारा शेडअभावी दिवेकर प्रवाशी चिखलात उभे

निवारा शेडअभावी दिवेकर प्रवाशी चिखलात उभे

दिवा, ता. ६ (बातमीदार) : निवारा शेड नसल्याने दिव्यातून ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईकडे कामानिमित्त बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे भरपावसात हाल होत आहेत. हक्काचा प्रवासी निवारा नसल्याचा नागरिकांना फटका बसत आहे. दिवावासीयांना दिवा टर्निंग येथील महोत्सव मैदानाजवळ पावसाच्या तुंबलेल्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यावर पालिका प्रशासनाने तातडीची उपाययोजना करण्याची मागणी दिवा प्रवासी करत आहेत.

ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या बस दिवा टर्निंगला येतात. रोजची चारशे-पाचशे प्रवासीसंख्या लक्षात घेता या ठिकाणी नागरिकांना रांगेत उभे राहण्यासाठी योग्य व्यवस्था वा प्रवासी निवारा नाही. पर्यायी जागा म्हणून दिवा महोत्सव मैदानाजवळ उभे राहून बस पकडण्यास सांगितले जाते; मात्र गेल्या चार दिवसांपासून पडलेल्या मुसळधार पावसामुळे या ठिकाणी पाणी साठत आहे. यामुळे येथे बससाठी थांबणेही कठीण झाले आहे. प्रवाशांना बस पकडण्यासाठी पावसात कसरत करावी लागत आहे. पावसात भिजलेल्या अवस्थेतच त्यांना कामावर जावे लागत आहे. परिणामी दिवा येथील नागरिकांचे हाल होत आहेत. अशा वेळी कोणतीही शिस्त नसल्याने नागरिक बस पकडण्यासाठी झटापट करत आहेत. त्यामुळे महिलांना बसमध्ये चढणे कठीण होत आहे.

पावसामुळे बसला उशीर झाल्यास सकाळच्या दरम्यान मोठी गर्दी होऊन चेंगराचेंगरी होत आहे. दरम्यान, हक्काचा प्रवासी निवारा नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत असून लवकरच प्रवासी निवाऱ्याची निर्मिती करावी, अशी मागणी आता दिवेवासी नागरिक करत आहेत.

प्रतिक्रिया

दिव्यात असणाऱ्या बस थांब्यांची जागा ही खासगी आहे. ती जागा मालकांनी दिल्यास आठवडाभरात प्रवासी निवारा लावण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनाही पावसात न भिजता कामाला जाता येईल.
- भालचंद्र बेहेरे, ठाणे परिवहन व्यवस्थापक

दिव्यात आधी नवी मुंबई व ठाण्यावरून बस येत नव्हत्या. आता कोरोनाच्या वेळेस त्या सुरू करण्यात आल्या. दिवावासीयांना नवी मुंबई, ठाणे आणि मुंबईला जाण्यासाठी फक्त रेल्वेवरच अवलंबून राहावे लागत होते. आता बसमुळे त्यांना प्रवास करणे सोयीचे झाले आहे. ज्या जागेत हा बस थांबा आहे, ती जागा खासगी आहे. त्या जागेचा मोबदला ठाणे महापालिकेने त्या जागा मालकांना द्यावा, म्हणजे जागा उपलब्ध करून देतील अन् लवकरच नागरिकांना प्रवासी निवाराही मिळेल.
- शैलेश पाटील, मा. नगरसेवक, ठामपा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com