मविआचाही बदलापूर नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप

मविआचाही बदलापूर नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप

Published on

बदलापूर, ता. ६ (बातमीदार) : काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत प्रशासकीय कालावधीत ६०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. आता भाजपपाठोपाठ महाविकास आघाडीनेदेखील नगरपालिकेत ६०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे.
या वेळी काँग्रेस शहराध्यक्ष संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत कोरोना काळात २०० कोटी; तर तीन वर्षांच्या एकूण प्रशासकीय काळात तब्बल ६०० कोटींचा भ्रष्टाचार कुळगाव-बदलापूर नगरपालिकेत झाला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी प्रकाश बोरसे, दीपक पुजारी व सध्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश गोडसे यांच्यासह शहरातील काही ठेकेदार कंपन्या, तसेच पालिकेचे इतर अधिकारी वर्ग यात सहभागी असल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. बदलापूर पश्चिमेकडील काँग्रेस शहर कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख किशोर पाटील, तसेच शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीणचे उपाध्यक्ष अविनाश देशमुख उपस्थित होते.
कोरोना काळात रुग्णांसहित नागरिकांना दिल्या गेलेल्या वस्तू या दुप्पट, तिप्पट नव्हे तर तब्बल दहापटापेक्षा जास्त पैसे देऊन विकत घेतल्या असल्याची बिले पालिकेने सादर केलेली आहेत. तसेच कोरोना काळात दिलेल्या चादरी, टूथ ब्रश, टूथपेस्ट, जेवण, चवनप्राश यात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला असून, कोरोना काळात रुग्णांना देण्यात आलेल्या एका उकडलेल्या अंड्याचे दर चाळीस रुपये इतके लावण्यात आले आहे. त्यामुळे हे सारे काही बदलापूरच्या जनतेला समजणे गरजेचे असून त्यांच्या पैशांची नाहक लूट या दरम्यान या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली असल्याचे आरोप या वेळी महाविकास आघाडीने केले आहेत.

------------
दंडात्मक, फौजदारी गुन्हा दाखल करा
प्रशासकीय कालावधीत नियमबाह्य व जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही परवानगी न घेता, दहा-दहा लाखांचे एकूण पंधराशेपेक्षा जास्त ठराव या दरम्यान केले असल्याचा आरोप संजय जाधव यांनी या वेळी केला. या भ्रष्टाचारात समाविष्ट असणाऱ्या या तीनही प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत ठेकेदार कंपन्या, त्या कंपन्यांचे मालक, पालिकेतील इतर अधिकारी वर्ग यांच्यावर दंडात्मक कारवाई सोबतच फौजदारी गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

------------
आमच्याकडे भ्रष्टाचारासंदर्भात कोणतीही तक्रार उपलब्ध झालेली नाही. संभाजी शिंदे यांच्या समवेत महाविकास आघाडीने केलेले आरोप चुकीचे आहेत. यासंदर्भात तुम्ही पुरावे सादर करा, शासनाकडून होणाऱ्या चौकशी आयोगाच्या समोर जाण्यास आमची तयारी आहे.
- योगेश गोडसे, मुख्याधिकारी, बदलापूर नगरपालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.