मुंबईत निवासी जागांच्या किमतीत वाढ

मुंबईत निवासी जागांच्या किमतीत वाढ

Published on

मुंबईत घरे महागली

दोन वर्षांत १४ टक्के वाढ; पायाभूत सुविधांचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबई आणि उपनगरांत व्यवसायाच्या वाढत्या संधी, शहरांत सुरू असलेली विकासकामे, वाहतूक व दळणवळणाच्या विकसित होणाऱ्या सुविधांमुळे मुंबईतील घरांच्या मागणीत वाढ होत आहे. निवासी मालमत्तांच्या किमतीत दोन वर्षांत (२०२१-२०२३) १.७ टक्के संयुक्त दराने वाढ झाली आहे. एकूण १४.४ टक्के वाढीची नोंद झाली आहे, असे मॅजिकब्रिक्सच्या प्रॉपइंडेक्स रिपोर्ट एप्रिल-जून २०२३ मध्ये नमूद केले आहे.
मुंबईत निवासी जागांची मागणी एप्रिल ते जून २०२३ या तिमाहीत २.८ टक्के वाढली आहे. जानेवारी ते मार्च या तिमाहीत मागणी ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०२२ या तिमाहीच्या तुलनेत २.४ टक्के घटली होती. निवासी जागांच्या पुरवठ्यात मागील तिमाहीच्या तुलनेत ४.३ टक्के घट झाली आहे. मालमत्तेचे सरासरी दर मागील तिमाहीच्या तुलनेत २.१ टक्क्यांनी वाढले आहेत. मुंबईत मध्यम श्रेणीतील मालमत्तांची मागणी वाढून ४९ टक्क्यांपर्यंत गेली आहे. छोट्या रचनांच्या घरांना ग्राहकांचे प्राधान्य कायम आहे. त्यामुळे टू बीएचके घरांचा एकूण मागणीतील वाटा ४२ टक्के आहे, तर १ बीएचके घरांचा वाटा ३१ टक्के आहे.
२०२३ च्या दुसऱ्या तिमाहीत नवी मुंबईतील मागणी मागील तिमाहीच्या तुलनेत २.१ टक्के वाढली आहे, तर पुरवठा ८.८ टक्के घटला आहे. सरासरी दर मागील तिमाहीच्या तुलनेत २.३ टक्के वाढले आहेत. ठाण्यातील निवासी जागांची मागणी स्थिर राहिली. मागील तिमाहीच्या तुलनेत मागणीत ०.३ टक्केच वाढ झाली, तर पुरवठ्यात ९.२ टक्के घट झाली आहे. ठाण्यातील मालमत्तेचे सरासरी दर २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीपासून १०.७ टक्क्यांनी वाढले आहेत. २०२१ ची दुसरी तिमाही ते २०२१ ची तिसरी तिमाही या काळात ९.९ टक्क्यांची घसरण झाल्यानंतर या दरांत सातत्याने वाढ होत आहे.

व्याजदरांत वाढ होऊनही घरांची मागणी वाढली आहे. अनेक बाजारपेठांतील घरांच्या किमती व ग्राहकांची आर्थिक क्षमता यात असमतोल आहे. परवडण्याजोग्या व मध्यम श्रेणीतील घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी पुरवठा वाढवण्याची आवश्यकता आहे.
- सुधीर पै, मुख्य कार्यकारी अधिकारी, मॅजिकब्रिक्स

घरांच्या मागणीतील वाढ
१४.४ टक्‍के एकूण वाढ
४९ टक्‍के मध्यम श्रेणीतील मालमत्ता
४२ टक्के टू बीएचके
३१ वन बीएचके

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.