मद्य तस्करीप्रकरणी चार ठिकाणी कारवाई

मद्य तस्करीप्रकरणी चार ठिकाणी कारवाई

मनोर, ता. ६ (बातमीदार) : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने तलासरी आणि जव्हार तालुक्यात केलेल्या चार कारवायांमध्ये दमण बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन दुचाकी आणि दोन रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. बुधवारी रात्री जव्हार तालुक्यातील जव्हार सिल्वास रस्त्यावर दोघांवर; तर गुरुवारी पहाटे तलासरी तालुक्यातील कोचाई भागात दोघांवर कारवाई करण्यात आली. कारवाईत ३०२ बल्क लिटर दमण बनावटीची विदेशी मद्यासह सहा लाख १६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोन दुचाकीस्वार आणि एका रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने बुधवारी रात्री जव्हार तालुक्यातील जव्हार-सिल्वास रस्त्यावरील डबकपाडा भागात सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये राजेशाम राजेश बुरा (वय ४४, रा. जव्हार) याला अटक करण्यात आली आहे. राजेशामकडून मद्य व दुचाकी असा ७२ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाईत जव्हार तालुक्यातील सागपानी-वावर रस्त्यावरील सागपाणी हद्दीत पांडुभाई दामुभाई चौधरी (वय ३०, रा. गारमाळ, प्राथमिक शाळेजवळ, सुलिया ता. कपराडा, जि. वलसाड) याच्याकडून मद्य व दुचाकी मिळून ९३ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

------------
रिक्षा जागीच सोडून चालक फरारी
गुरुवारी पहाटे तलासरी तालुक्यातील कोचाई-आमगाव रस्त्यावर कोचाई ग्रामपंचायत कार्यालयासमोर सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये दमण बनावटीच्या मद्याची वाहतूक करणारी रिक्षा जप्त करण्यात आली. रिक्षाचालक लखू वरठा (वय ३१, रा. बोरदनपाडा अथल लुहारी दादरा नगर हवेली) याच्याकडून बिअर आणि रिक्षा मिळून दोन लाख १६ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच कोचाई-आमगाव रस्त्यावर गस्त सुरू असताना एक संशयित रिक्षा गस्ती पथकाच्या दिशेने येत असताना दिसून आली; परंतु रिक्षाचालकाला गस्ती पथकाची चाहूल लागताच रिक्षाचालक रिक्षा रस्त्यावर उभी करून जंगलाच्या दिशेने पळून गेला. भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी रिक्षाची तपासणी केली असता रिक्षामध्ये दमण बनावटीचे विदेशी मद्य आणि बिअरचा साठा आढळून आला.


उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक सुधाकर कदम, उपअधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर यांच्या नेतृत्वाखाली पथकातील दुय्यम निरीक्षक उदय अनंत शिंदे, पांडुरंग टी. पडवळ यांच्यासह जवानांनी ही कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com