प्रशासक राजवटीची वर्षपूर्ती

प्रशासक राजवटीची वर्षपूर्ती

नवीन पनवेल, ता. ८(वार्ताहर)ः पनवेल महापालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे पदभार आहे. या कालावधीमध्ये पनवेल शहराच्या विकासाच्या अनुषंगाने विविध प्रकल्प मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात मालमत्ता कर वसुलीवरही विशेष भर देण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये भर पडली असून विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.
पनवेल महापालिकेची २ ऑक्टोबर २०१६ साली स्थापना झाली. त्यानंतर वर्षभरात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यामध्ये पाच वर्ष डॉ. कविता चौतमोल यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार चालला. पण मुदत संपल्यामुळे पनवेल महापालिकेवर वर्षभरापूर्वी आयुक्त गणेश देशमुख यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. या काळात मालमत्ता कराचा तिढा कायम असला तरी सक्तीच्या वसुलीवर भर देत महापालिका प्रशासनाने बऱ्याच अंशी मालमत्ता कर वसूल केला. त्याचबरोबर इतर मूलभूत सुविधाही हस्तांतर करून घेतल्या. या सोयीसुविधा सिडकोपेक्षा दर्जेदार पुरवण्याच्या अनुषंगाने प्रयत्न सुरू असून आरोग्य आणि वैद्यकीय सुविधांवर विशेष भर दिला आहे.
----------------------------------------------
आरोग्य सेवेला बळकटी
आसूड गाव येथे माता बाल संगोपन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. साडेचारशे घाटांचे हे सुसज्ज, असे रुग्णालय असणार आहे. आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दोन रुग्णालय सुरू करण्यात येणार आहेत.
--------------------------------------
समाविष्ट गावांचा विकास
पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट गावांचा विकास करण्याकरता पाऊल उचलण्यात आले. या ठिकाणी मल:निसारण वाहिन्याबरोबर प्रक्रिया करणारे केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. गावांमध्ये पाणीपुरवठा योजना ही कार्यान्वित केल्या जाणार आहेत. महापालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते पूर्णत्वास नेण्यात आले. यंदा पूर्ण क्षमतेने पावसाळी नाल्यांची सफाई सिडको वसाहतींमध्ये करण्यात आली.
---------------------------------------------------
महिलांना रोजगाराची संधी
महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून वाहन चालवणे. प्रशिक्षण त्याचबरोबर इतर रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. मुलींना शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली. महापालिका भवनाच्या कामाला गती देण्यात आली. याशिवाय सिडको वसाहतींमधील उद्यानांचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले.
--------------------------------------------
शहर स्वच्छतेवर भर
आंतरराष्ट्रीय दर्जाची क्रिकेट अकादमी उभारण्यात येत आहे. या कामाला सुद्धा वेग आल्याचे दिसून आले. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पनवेल महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण करण्यात आले. लोकसहभागातून कळंबोली जंक्शनचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर उड्डाणपूल आणि सार्वजनिक ठिकाणच्या भिंती बोलू लागल्या आहेत.
--------------------------------------------
सिडको वसाहतींचा विकास
पनवेल महापालिका क्षेत्रात ज्या सिडको वसाहती होत्या. त्या महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. प्रशासक म्हणून यासाठी गणेश देशमुख यांनी विशेष पुढाकार घेतला. रस्त्यांच्या डागडुजीचे काम हाती घेऊन त्यांची पावसाळ्यापूर्वी चांगली स्थिती निर्माण करण्यात आली. पारंपरिक पथदिवे बदलून तेथे एलईडी दिवे बसवण्यात आले.
----------------------------------------------
गेल्या वर्षभरामध्ये प्रशासकाचा कारभार सुरू आहे. मात्र, महापालिका क्षेत्रात भरीव असे कोणतेही कामे दिसून आले नाहीत. मालमत्ता कराचे भिजत घोंगडे आजही कायम आहे.
-दीपक निकम, पनवेल विधानसभा संघटक, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना
-------------------------------------
पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर विकासाला वेग आणि
चालना मिळेल, अशा प्रकारची धारण आणि भावना पनवेलकरांची होती. गेली पाच वर्ष आणि प्रशासकाचे एक वर्ष यात फारसा काही फरक आढळून आला नाही.
-विजय काळे, शेकाप, पनवेल
-----------------------------------
पनवेलच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वांनीच सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. महापालिकेने काही सुविधांचा विकास केला असला तरी आजही अनेक मूलभूत सोयींची प्रतीक्षा आहे. रस्ते, पाणी आणि इतर गोष्टींवर भर देण्याची गरज आहे.
-नीलम आंधळे, संस्थापिका, दिशा व्यासपीठ
------------------------------------------------
सिडको वसाहतींमध्ये विविध कामांना सुरुवात झाली आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्या निर्णयांची अंमलबजावणी प्रशासकांच्या कालावधीमध्ये करण्यात आली.
- संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष, पनवेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com