धबधब्यांतून अनुभवा जव्हारवारी

धबधब्यांतून अनुभवा जव्हारवारी

Published on

संदीप साळवे, जव्हार
पावसाळ्यात निसर्गाने मुक्तहस्ताने रंगांची उधळण करत तालुक्यात सृष्टीसौंदर्य खुलवले आहे. ऐतिहासिक, निसर्गरम्य तालुक्यात पावसाळ्यात दाट हिरवळ, थंडगार हवा, सोसाट्याचा वारा यामुळे अंग ओलेचिंब भिजून शहारे येतात. हे अनुभवताना पर्यटकांना एक वेगळ्या प्रकारचे अकल्पित समाधान मिळते. त्यामुळे पावसाळी सहल करण्याचा बेत झाल्यास पर्यटक सर्वप्रथम जव्हारलाच पसंती देतात.

मुंबई, ठाणे शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गनिर्मित पर्यटनस्थळे हे जव्हारचे वैशिष्ट्य आहे. या परिसरात पर्यटक आल्यानंतर नाचणीची भाकरी, उडदाचा भुजा आणि मिरचीचा ठेचा, डोंगरदऱ्यांत रानभाज्यांची पर्यटकांना भुरळ पडत आहे. मुंबई असो वा नाशिक, डहाणू-पालघर-बोईसर या रस्त्यावरून जव्हारकडे मार्गक्रमण करत असताना उंच टेकड्यांवरून पांढऱ्या शुभ्र रंगात धबधबे पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेला विक्रीसाठी उपलब्ध होत असलेले मासे, खेकडे या भागातील आदिवासी बांधवांना रोजगार मिळतो. पावसाळ्यात खवय्यांना मांसाहार चाखण्याची एक वेगळी अनुभूती मिळते.

तालुक्यात धबधब्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्यटकांमध्ये एक विशेष ओढ असते. पावसात भिजल्यानंतर गरमागरम जेवण मिळण्याची व्यवस्था आता धबधब्यापासून काही अंतरावर झाली असल्याने पर्यटक आनंद लुटण्यासाठी या तालुक्यात येत आहेत.

हिरडपाडा धबधबा
जव्हार शहरापासून सुमारे १३ किमी अंतरावर असणाऱ्या हिरडपाडा गावात असणारा धबधबा उंचीवरून कोसळणारा आहे. हा जास्त प्रचलित नसल्यामुळे धबधब्यापर्यंत जायला पुरेशी व्यवस्था नाही. मात्र थोडी पायपीट केली तर नयनरम्य हिरडपाडा धबधबा पाहायला मिळतो. हा धबधबा लेंडी नदीवर आहे.

काळमांडवी धबधबा
जव्हार शहरापासून पाच किमी अंतरावर असणाऱ्या केळीचा पाडा या गावातून तीन किमी अंतरावर आत गेल्यावर काळमांडवी धबधब्याचे दर्शन होते. काळशेती नदीवर धबधबा असल्याने त्याचे नाव काळमांडवी असे पडले. अतिशय सुंदर अशी निसर्गाची कलाकृती बघायला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

दाबोसा धबधबा
जव्हार तालुक्यापासून १७ किमी अंतरावर असलेले नैसर्गिक पर्यटनस्थळ म्हणजे दाबोसा धबधबा. या ठिकाणी पर्यटकांची झुंबड उडाली असून ठाणे, नाशिक, सिल्व्हासा, वाडा, विक्रमगड या ठिकाणाहून अनेक जण डोंगरदरीतील नैसर्गिक धबधबा पाहायला येतात. शनिवार, रविवारसह सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.