ग्रामीण भागातही उभी राहणार वाचन चळवळ

ग्रामीण भागातही उभी राहणार वाचन चळवळ

Published on

राहुल क्षीरसागर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना वाचनाची आवड आहे, पण सर्वच पुस्तके विकत घेऊन वाचणे हे परवडत नाही. ही बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नागरी सुविधेच्या २८ ग्रामपंचायतींमध्ये ई स्मार्ट ग्रंथालय तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसह त्यांच्या मुलांना पुस्तके वाचनाची सवय होईल. तसेच या ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
‘वाचाल तर वाचाल’ या उक्तीप्रमाणे आज अनेक शासकीय कार्यालये, सार्वजनिक आरोग्य विभागात, रुग्णालयांमध्ये वाचनालय अथवा ग्रंथालयांची उभारणी करण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याबरोबरच सवय व्हावी या उद्देशाने वाचनालय उभारण्यात येत आहे. अशातच अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध व्हावा, यासाठी त्या पुस्तकांचे स्कॅनिंग करून ग्रंथालयांमध्ये ठेवण्यात येत आहे. अशातच शहरी भागात आज मोठ्या संख्येने हायटेक व स्मार्ट ग्रंथालय आणि वाचनालयांची उभारणी करण्यात येत आहे. असे असताना आता ग्रामीण भागातील नागरिकांना, वाचकांना विविध साहित्यिकांच्या, स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी, प्रबोधनात्मक आणि शालेय विषयांवरील पुस्तकांचा खजिना उलब्ध व्हावा यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पनेतून नागरी सुविधांच्या ३४ पैकी २८ ग्रामपंचायतींमध्ये ई स्मार्ट ग्रंथालयांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येकी पाच लाखांचे अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानाच्या माध्यमातून पुस्तके, संगणक तसेच ग्रंथालयाची उभारणी करताना करण्यात येणारी रचना ही साहित्यावर आधारित असलेल्या वातावरणासह पुस्तकांची ठेवण वेगळ्या पद्धतीने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही सुविधा वाचकांना मिळणार आहेत.
.........................
देखरेखीसाठी मदर लायब्ररी
ग्रामीण भागातील २८ ग्रामपंचायतींमध्ये उभारण्यात येणाऱ्या ई स्मार्ट ग्रंथालयांवर नजर अथवा त्यांचे नियोजन करण्यासाठी मदर लायब्ररीची उभारणी करण्यात येणार आहे. ग्रंथालयामध्ये वाचक गेल्यास त्याला सुरुवातीला रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉगीन आयडी तयार करण्यात येणार आहे. हा आयडी तयार झाल्यानंतर तो मदर लायब्ररीशी जोडल्यानंतर अप्रुवल मिळणार, अप्रुवल मिळताच वाचकाला ई ग्रंथालयाचा वापर करता येणार आहे. मदर लायब्ररी उभारण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत निधी मागणी करण्यात आला आहे.
.................................
ई स्मार्ट ग्रंथालयाची संख्या
भिवंडी २०
अंबरनाथ ०२
शहापूर ०३
कल्याण ०३
............................................
ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून गावातच सुविधा मिळाव्यात, वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या संकल्पनेतून ई स्मार्ट ग्रंथालय उभारण्यात येत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना व वाचकांना शालेय अभ्यासाबरोबर स्पर्धा परीक्षा आणि प्रबोधनात्मक पुस्तकांचा ठेवा असणार आहेत.
- प्रमोद काळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा), जि. प. ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.