नव मतदारांची संख्या वाढविण्याचे प्रशासनासमोर आवाहन

नव मतदारांची संख्या वाढविण्याचे प्रशासनासमोर आवाहन

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ठाणे जिल्ह्यात मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. असे असले तरी दुसरीकडे जिल्ह्यात १८ वर्षे पूर्ण झालेली दोन लाख ९७ हजारांच्या आसपास नवमतदारांची संख्या असून त्यापैकी अवघ्या ४६ हजार ९९ नवमतदारांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. त्यामुळे नवमतदारांची नोंदणी वाढविणे हे जिल्हा प्रशासनासमोर मोठे आव्हान असल्याचे दिसून येत आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, विधानसभा सार्वत्रिक निवडणुका होणार असल्याने भारत निवडणूक आयोगाद्वारे १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून त्याबाबतची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले, की ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ व १८ विधानसभा मतदारसंघ असून ५ जानेवारी २०२३ रोजी प्रसिध्द झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार ठाणे जिल्ह्यात ६२ लाख १४ हजार ५१७ इतके मतदार असून यामध्ये ३३ लाख ६७ हजार १२० पुरुष मतदार तर, २८ लाख ४६ हजार ३१९ महिला मतदार आणि १ हजार ०७८ तृतीयपंथीय मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ५ लाखाने कमी असल्याची माहिती दिली. तर, दुसरीकडे जिल्ह्यात १८ वर्षे पूर्ण झालेले महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या सुमारे दोन लाख ९७ हजारांच्या आसपास असून त्यापैकी अवघ्या ४६ हजार ९९ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नव मतदारांची नोंदणी वाढविण्याचे उद्दिष्ट असल्याचे देखील शिनगारे यांनी यावेळी सांगितले.
....................................
मतदान केंद्र तळमजल्यावर
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या ६ हजार ३९१ इतकी आहे. त्यापैकी बहुतांशी मतदान केंद्र हे तळमजल्यावर आहेत; परंतु काही केंद्रे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर आहेत. त्यामुळे वयोवृद्ध मतदारांची गैरसोय होत असते. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील २२४ मतदान केंद्र तळमजल्यावर आणण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आली असून जागेचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिनगारे यांनी सांगितले.
.............................
संकेतस्थळाचा वापर करा
मतदार, भावी मतदार त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती, स्थलांतरण, मयत मतदाराची वगळणी, मतदार यादीत नाव आहे किंवा नाही यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.