गतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरी

गतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्यास एक वर्षे सक्तमजुरी

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ८ : ‘आंबा खायला देतो’ असे आमिष दाखवून गतिमंद मुलीचा विनयभंग करणाऱ्या रोहिदास गांगुर्डे (५८) याला ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश एच. के. परदेशी यांनी गुरुवारी दोषी ठरवत, एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल फास्ट ट्रॅकवर लावण्यात आला असून ही घटना २३ आणि २४ मे २०२३ रोजी श्रीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर बारा तासात तपास करून त्याच दिवशी आरोपीसह दोषारोपपत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले होते.
पीडित मुलगी कर्नाटक येथून ठाण्यात मामाकडे राहण्यासाठी आली होती. त्याचदरम्यान आरोपी रोहिदास गांगुर्डे याने तिचा विनयभंग केला. घडलेला प्रकार पीडित मुलीने तिच्या मामाला सांगितला. त्यानुसार याचा जाब तिच्या मामाने आरोपीला जाऊन विचारला. त्या वेळी त्याने ‘पोलिसात तक्रार करा, मी बघून घेईन’ अशी अरेरावीची भाषा करून दमदाटी केली. त्यानंतर याप्रकरणी ३० मे २०२३ रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर गुन्ह्याचा जलद गतीने १२ तासांत तपास पूर्ण करून आरोपीला अटक केली आणि त्याच दिवशी आरोपीसह दोषारोपपत्र ठाणे न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी हा गुन्हा फास्ट ट्रॅकवर चालवण्याची विनंती न्यायालयास केली. ती विनंती मान्य करून त्या खटल्याचे कामकाज न्यायाधीश एच. के. परदेशी यांच्यासमोर सुरू झाले. त्या वेळी सरकारी वकील पिसाट यांनी सादर केले पुरावे आणि साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून ठाणे न्यायालयाने आरोपीस गुरुवारी ६ जुलै रोजी एक वर्ष सक्त मजुरी आणि ११ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणाचा तपास वागळे इस्टेट,परिमंडळ-५ चे पोलीस उप आयुक्त अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त गजानन काब्दुले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहायक पोलीस निरीक्षक संभाजी मोहिते, पोलीस उप निरीक्षक नितीन हांगे, प्रमोद पाटील, सहायक पोलीस उप निरीक्षक माणिक इंगळे, पोलीस हवालदार मुकेश इघे, कैलास जाधव, चंद्रकांत संकपाळ, प्रकाश चव्हाण, पोलिस नाईक नीलेश धुत्रे यांनी केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.