पावसाळी पर्यटनासाठी शहापूर सज्ज

पावसाळी पर्यटनासाठी शहापूर सज्ज

नरेश जाधव, खर्डी
पावसाळा सुरू झाला, की नकळत पावले वळतात ती निसर्गाच्या सान्निध्यात. मनमुराद आनंद लुटण्यासाठी. त्यामुळे पावसात कधी धबधब्याच्या ठिकाणी, तर कधी ट्रेकिंगसाठी डोंगर-दऱ्यात फिरून वीकेंड मौजमस्तीत घालवण्यासाठी तरुणाई जोषात पर्यटनस्थळी निघते. या पावसाळी पर्यटनासाठी शहापूर तालुका सज्ज झाला आहे. तालुक्यातील माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेला धबधबा तसेच कसाराजवळील विहिगावचा अशोका धबधबा तरुणाईसाठी आकर्षण ठरत आहे. येथे तरुणाईसह पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र येथे पर्यटकांनी निसर्गाच्या प्रेमात आणि वेडात आपले भान न हरवता निसर्गाचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन इथल्या ग्रामस्थांनी केले आहे.
पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी, असे हे ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाचे ठिकाण म्हणजे शहापूरपासून ७ कि. मी. अंतरावर असलेला माहुली किल्ला. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले हे धबधबे पर्यटकांना भुरळ पाडतात. येथे एकूण तीन धबधबे रांगेत पर्यटकांची प्रतीक्षा करत आहेत असा जणू भासच होत असतो. या धबधब्यांपर्यंत जाण्यासाठी माहुली निसर्ग मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पायवाट बनवलेली आहे. वळण वाटा असलेला रस्ता, चालताना झोंबणारा गार वारा, संपूर्ण हिरवीगार झाडी, डोंगरावर उगवलेले गवत यामुळे पर्यटकांना येथे जणू स्वर्गाचा भासच होतो.
तालुक्यातील कसारा येथून १० किमी अंतरावर विहिगांव येथे असलेला अशोका धबधबा सध्या ओसंडून वाहू लागल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे. मुंबई-नाशिक महामार्गापासून जवळच असल्याने या धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे येथील आदिवासी बांधवांना चार महिने रोजगार उपलब्ध होत असतो. विहंगमदॄश्य आणि निसर्गरम्य उंच उंच डोंगरातून हा धबधबा खाली झेपावत असल्याने पर्यटकांच्या पसंतीचा ठरला आहे. पावसाच्या थेंबासोबतच निसर्गाची साथ, आजूबाजूला पसरलेले धुके, पावसाचा मनमुराद आनंद लुटत असतांना दाट गर्द हिरवळ झाडीच्या कुशीत लपलेला हा धबधबा वीकेण्डला पर्यटकांनी खुलून जातो.
....
शहरातील पर्यटकांची गर्दी
सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूरसह नाशिक येथून येणाऱ्या पर्यटकांची पावल शहापूर तालुक्यातील धबधब्यांकडे वळत आहेत. उंचावरून पडणारा फेसाळलेला पांढरा शुभ्र धबधब्याच्या पाण्यात भिजण्याचा हे पर्यटक आनंद घेत आहेत.
....
माहुली किल्लाच्या पायथ्याशी हा धबधबा असल्याने व मुंबई नजीक असल्याने पर्यटकांना किल्ल्यावर ही पर्यटन करता येत असल्याने येथे शनिवार, रविवार पर्यटक भेट देत असतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगारही मिळत आहे.
- अनिल घोडविंदे, ग्रामस्थ

निसर्गरम्य अशोका धबधबा बघायला आम्ही नाशिक येथून आलो आहे. येथे पायऱ्या बनवल्याने चांगली सुविधा उपलब्ध झाली असून, येथील धबधब्याखाली भिजण्याचा कुटुबासह आनंद घेत आहेत.
- रोहन गांगुर्डे/सलमान शेख, पर्यटक नाशिक
.....
माहुलीला कसे पोहचाल
मध्य रेल्वेने किंवा मुंबई -आग्रा महामार्गाने प्रवास करत असाल, तर आसनगाव येथे उतरून रिक्षाने किंवा जीपने माहुली येथे पोहचता येते. आसनगाव ते माहुली धबधबा हे अंतर ७ कि. मी. आहे.
....
कसे जाल विहिगांवला
लोकलने कसारा रेल्वे स्थानकावर उतरावे. पूर्वेला बाहेर आल्यावर मुख्य बाजारपेठेतून थेट रिक्षाने अशोका धबधब्यावर जाता येते. खासगी वाहनाने आल्यावर मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात डावीकडे एकमेव जव्हार फाटा आहे. तेथून अवघे दोन किमी अंतर कापून अशोका धबधब्यावर जाता येत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com