खलाटीत घुमू लागले आवणीचे सूर

खलाटीत घुमू लागले आवणीचे सूर

Published on

महेंद्र दुसार, अलिबाग
ढोपरभर चिखल, मुसळधार पाऊस, अंग गारठून टाकणारा गारवा, यात भातलावणीची लगबग असे चित्र सध्या जिल्‍ह्यात ठिकठिकाणी दिसत असून खलाटीत आवणीचे सूरही घुमू लागले आहेत. दिवसातील दहा-दहा तास लावणी करताना येणारा कंटाळा दूर करण्यासाठी शेतकरी आवणीची गाणी म्हणतात. यात कुटुंबासह मित्रपरिवारही उत्‍साहाने सहभागी होत चाकरमानीही खास लावणीसाठी गावात दाखल होऊ लागले आहेत.
आवणीची गाणी म्हणत भातलावणी करण्यात मजा वेगळीच असते. यातून कोकणची समृद्ध लोकसंस्कृती दिसून येते. या गाण्यांमधून वेगवेळ्या चालीरीती, येथील परंपरा दिसून येतात. ‘मांज्या संग चलरं भरतारा, उंबयच्या बाजारा’ हे गाणं एका सुरात म्हणत नव विवाहिता नवऱ्याला बाजारात येण्याची विनंती करते. असे म्हणतात पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत नवरा-बायको थेट संवाद साधत नसत, तेव्हा ही आवणीची गाणी एक संवादाचे माध्यम होते. सासू-सुनांचा रुसवा, फुगवा देखील या गाण्यांमधून व्यक्त होताना दिसतो. यात अनेक गंमती जमतीही घडतात. ‘आहे उंबापुरी, सात बेटावरी’ असे गाण गात मुंबई शहराची महती सांगितली जाते.
कोकणातील माणसांना एकेकाळी मुंबई शहराबद्दल विशेष आकर्षण असल्याने खास भात लावणीसाठी मुंबईतून आलेल्या शेतमालकाला खूश करण्यासाठी ‘रंगानं कसा रंगलाय रं... साहेबा तुझा बंगला रं’ असे गाणे आवर्जून गायले जायचे, या गाण्याची क्रेझ आजही कायम असून आता लावणीसाठी येणार्‌या चाकरमान्यांसाठी ते गायले जाते.
सध्या डोंगरपट्ट्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भातखाचरे तुडुंब भरली आहेत. आवणीइतके पाणी साचल्‍याने भात लावणीला वेगाने सुरुवात झाली आहे. डोक्यावर ईरले, घोंगडी व प्लास्टिक कागद घेऊन चिखल तुडवत लावणी केली जात आहे. आदिवासी शेतकरी मुलाबाळांसह शेतीच्या कामात गुंतले आहेत तर खारेपाट, कुंडलिका खोरे, मुरूड तालुक्यातील सखल भागात उशिराने पेरणी केलेली भात रोपे अद्याप लहान आहेत. येथे लावणीस विलंब होण्याची शक्‍यता आहे.
मजुरीचे दर वाढल्‍याने शेतकरी, नातेवाईक, मित्रमंडळी, मुंबईतील चाकरमान्यांना यांना बोलावून एकमेकांची शेतीची कामे पूर्ण करीत आहेत. भात हेच जिल्ह्याचे मुख्य पीक असल्याने शेतकरी भाताच्या आधुनिक जातीची लागवड करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

लावणीसाठी चाकरमानी खलाटीत
कोकणातली पारंपरिक भातशेती आता नाहिशी होत आहे; परंतु जी शेती शिल्लक आहे, त्‍यातही मजुरी मिळत नसल्‍याने आणि मुलाबाळांना भातलावणीचा आनंद घेता यावा, यासाठी शहरात राहणारे नातेवाईकही गावांत दाखल होत आहेत. पावसाळा सुरू झाला, की शहरी पर्यटकांना जसे धबधबे आणि निसर्ग पर्यटनाचे वेध लागतात, त्याच वेळी शेतकऱ्याकडे भात लावणीची लगबग सुरू होते. पहिल्या पावसात भाताची रोपे करायची आणि पावसाने वेग धरला, की एका दमात कुटुंब, मित्र परिवारासह भातलावणी करायची, अशी परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. कामानिमित्त शहरात गेलेली मंडळी भातलावणीसाठी आवर्जून गावाला येतात. शेतकऱ्यांसाठी भातलावणी हा एक स्नेहमेळावाच असतो.

माघारनींची लगबग
घरातील सर्व माणसे शेतावर गेल्यावर त्या लोकांपेक्षा जास्त लगबग घरात राहिलेल्या माघारनींची असते. त्या सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी न्याहारी करतात. शेतात काम करणाऱ्यांना सकस आहार देण्याची जबाबदारी या माघारनींची असते. कोवळ्या उन्हातच कुटुंब शेताकडे रवाना होते. महिला दुपारचा स्वयंपाक आटोपून ते एका टोपलीतून शेताकडे घेऊन जातात. सर्वजण जेवून झाल्यावर या स्‍त्रिया भात लावणीच्या कामाला हातभात लावतात. या वेळी मनोरंजनासाठी महिला गावाकडची जुनी पारंपरिक गाणी, ओव्या गात भातलावणी करतात. पुरुष मंडळी त्यांना दाद तर देतातच, हल्‍ली यात चित्रपटगीतेही समाविष्‍ट करण्यात आली आहेत. दुपारच्या जेवणानंतरही सूर्यास्तापर्यंत लावणीची कामे सुरू असतात.


भर पावसात जेवणासाठी सुकी जागा शोधूनही सापडत नाही. चिखलाने माखलेले हात-पाय, ओलेचिंब कपडे परिधान करूनच दुपारच्या वेळेस शेताच्या बांधावरच पंगती बसतात. ताटात टपकणाऱ्या पाण्याची पर्वा न करताच जेवणाचा आस्‍वाद घेतला
जातो. भर पावसात शेताच्या बांधावर जेवणाची मजा काही वेगळीच असते. या जेवणात खमंग वालाचा बिरडा हमखास असते.
- रत्नाकर पाटील, शेखाचे गाव

शेती संकटात सापडली आहे त्याचप्रमाणे आवणीचे सूर काही प्रमाणात कमी होत आहेत. ही सर्व गीते अलिखित आहेत. या गाण्यांमध्ये खूप मोठा अर्थबोध होत असतो. यातून चांगला संदेश देण्याचाही प्रयत्न असतो. आगरी, बाणकोटी, कातकरी बोलीभाषेतील ही गिते पुढच्या पिढीला समजावी म्हणून लिखित स्वरूपात संग्रहित ठेवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- शांताराम कदम, प्रगतशील शेतकरी

अलिबाग ः वाडगाव येथे सुरू असलेले लावणीची कामे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.