पावसाळी पर्यटनस्थळांचा बहर फुलवा

पावसाळी पर्यटनस्थळांचा बहर फुलवा

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ८ ः हिरव्यागार डोंगररांगा... डोंगरावर उतरलेले दाट धुक्याचे ढग... डोंगराच्या कुशीतून कोसळणारा धबधबा... आणि पक्ष्यांचा किलबिलाट... असे डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य फक्त पावसाळ्यातच पाहायला मिळते. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा थकवा घालवण्यासाठी आठवड्याच्या सुट्टीला शहरापासून दूरवर जाऊन पावसाळी पर्यटनाला सर्वांनाच जायला आवडते. मात्र, काही बेजबाबदार पर्यटकांमुळे संपूर्ण पर्यटनस्थळ बंद करण्यामागे प्रशासन लागले आहेत. अशा वेळेस संपूर्ण पर्यटनस्थळ बंद करण्यापेक्षा पर्यटनाचे काटेकोर नियम, पर्यटकांना सुविधा आणि दुर्घटना होऊ नये म्हणून उपाययोजना केल्यास पर्यटकांना विरंगुळ्याचे केंद्र मिळेल आणि स्थानिकांना रोजगार, अशी ओरड आता सामान्यांमधून होऊ लागली आहे.
नवी मुंबईत ऐरोली ते पनवेल दरम्यान अनेक डोंगररांगा आहेत. घणसोली येथील गवळीदेव धबधबा हा कल्याण-डोंबिवली, ठाणे, नवी मुंबईकरांमध्ये प्रसिद्ध आहे. वन विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या या डोंगरावर जाण्यासाठी खडकाळ आणि आडवळणाची वाट आहे. चारही बाजूला हिरव्यागार झाडांची वनराई पाहताच मन प्रसन्न होऊन जाईल, असे वातावरण येथे असते; मात्र या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी आणि नीटनेटक्या स्वच्छतागृहाची प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आलेली नाही. बेलापूर सेक्टर ८ येथील आर्टिस्ट व्हिलेज डोंगरावरील धबधबा हादेखील तरुणांमध्ये तेवढाच आवडीचा आहे. या धबधब्यापर्यंत जाण्यासाठी तर वाटच नाही. तसेच पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या नावाखाली सिडको आणि नवी मुंबई पोलिसांनी ही सर्व पर्यटनस्थळे बंद केली आहेत. प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे नाईलाजास्तव पर्यटकांना लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरानसारख्या दूरवरच्या ठिकाणी धाव घ्यावी लागत आहे.
-----------------------------------
गावात असल्याचा भास
- चहूबाजूला हिरवीगार दाट झाडेझुडपे, डोंगरावरील भव्य शिळा, डोंगराच्या पायवाटेतून कोसळणारे लहान-मोठे शेकडो धबधबे, पांढरेशुभ्र बगळे, गवतात चरणाऱ्या स्थानिक आदिवासींच्या गाई आणि शेळ्यांचे कळप पाहून नवी मुंबईत नसून गावात असल्यासारखे वाटते.
़़़़़़ः- या ठिकाणी पावसाळी दुर्मिळ आणि औषधी रानभाज्यासुद्धा सापडतात. जंगलातून वाटेचा शोध घेत धबधब्यापर्यंत पोहोचावे लागते. शेजारच्या खारघर रेन्ट्री हील येथेसुद्धा अशीच परिस्थिती आहे. या टेकडीवर तर पावसाळ्यात नंदनवन फुलल्याचा आभास होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com