जिवावर उदार होऊन कर्तव्याची अंमलबजावणी

जिवावर उदार होऊन कर्तव्याची अंमलबजावणी

Published on

मोखाडा, ता. ११ (बातमीदार) : तालुक्याला सुरळीत वीजपुरवठा व्हावा, म्हणून वायरमन तांत्रिक बिघाड दुरुस्त करत आहेत. त्यासाठी दर्या, डोंगर पायदळी तुडवत ऊन, वारा, वादळ आणि पावसाशी रात्रंदिवस संघर्ष करत जिवावर उदार होऊन काम करावे लागत आहे. जिवावर बेतणाऱ्या अवघड ठिकाणी विजेच्या खांबावर चढून वीजपुरवठा सुरळीत करत आहेत.

मोखाडा तालुक्यात विजेचा पुरवठा सूर्यानगर, डहाणू, गंजाड, कासा आणि जव्हारमार्गे नदी, नाले, दरी, डोंगर आणि जंगलपट्टीतून आला आहे. तालुक्यात सन १९६८ ते १९७० सालात विद्युतीकरण झाले. तालुक्यात नऊ हजारांहून अधिक वीज ग्राहक आहेत. बहुतांश ठिकाणी जुनाट झालेल्या साहित्यामुळे तांत्रिक बिघाड होतो. या भागात मुसळधार वादळी पावसाचे प्रमाण अधिक आहे. तसेच तालुक्यात येणारा वीजपुरवठा सुमारे १२० किलोमीटर अंतरावरून येतो. त्यामुळे पुरवठ्यात सातत्याने तांत्रिक बिघाड होत असतात. त्यामुळे वीज ग्राहक संतप्त होतात. स्थानिक महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना, ग्राहकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. मात्र महावितरणचे कर्मचारी वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा, म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

तालुक्यातील कारेगाव, गोमघर, सूर्यमाळ या फिडरवरील सुमारे १० ते १५ गावांचा वीजपुरवठा रविवारी (ता. ९) खंडित झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी महावितरणचे राम जोशी, उमेश झिंजुर्डे, संतोष पाटील आणि सदानंद पाटील हे कर्मचारी मुसळधार पावसात नदी, नाले, जंगल मुसळधार पावसात पायाखाली घालत होते. त्यावेळी त्यांना जंगलात गारगई नदीजवळील खांबावर तांत्रिक बिघाड आढळून आला. त्यावेळी त्यांनी मुसळधार पावसात, एका बाजूला खोल दरी, नदीच्या पाण्याचा प्रवाह अशा अवघड परिस्थितीमध्ये विजेच्या खांबावर चढून, दोन ते तीन तास संघर्ष करत तांत्रिक बिघाड दुरुस्त केला आहे.

सूर्यानगर, डहाणू आणि गंजाड परिसरात तांत्रिक बिघाड झाल्यास वीजपुरवठा खंडित होतो. मात्र, तालुक्यात कुठेही तांत्रिक बिघाड झाल्यास कर्मचारी रात्रंदिवस बिकट परिस्थितीचा संघर्ष करून तो सुरळीत करतात. ग्राहकांना नियमित, सुरळीत वीजपुरवठा व्हावा, हे कर्मचाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आम्ही परिस्थितीवर मात करत काम करतो.
- किरण थाटे, कनिष्ठ अभियंता, महावितरण, मोखाडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.