पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ‘गाव तेथे देवरार्ई’

पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ‘गाव तेथे देवरार्ई’

ठाणे, ता. १० (बातमीदार) : जिल्ह्यात पर्यावरण क्षेत्रात गेली २४ वर्षे काम करणारे पर्यावरण दक्षता मंडळ या संस्थेने नुकताच त्यांचा २४ वा वर्धापन दिन ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरा केला. असे असताना २५व्या वर्षात पदार्पण करताना संस्थेतर्फे नवनवीन उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. यात शहरातील तलावांचे संवर्धन, स्वच्छ खाडी अभियान, गाव तिथे देवराई असे विविध उपक्रम मंडळामार्फत राबविण्यात येणार आहेत.
ठाण्यातील सहयोग मंदिर सभागृहात रविवारी या संस्थेचा वर्धापनदिन सोहळा पार पडला. या सोहळ्यात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चचे प्राध्यापक डॉ. मिलिंद वाटवे, रघुनाथ ढोले आणि रामचंद्र आपटे उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात नृत्य आविष्काराने करण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
या आठवड्यापासून आभासी माध्यमाद्वारे पर्यावरण शाळा सुरू होणार असल्याची माहिती मंडळामार्फत उपस्थितांना देण्यात आली. यावेळी ‘आपलं पर्यावरण’ चे मुख्य संपादक डॉ. संजय जोशी यांनी ‘आपलं पर्यावरण’ या संस्थेच्या मासिकाबद्दल गेल्या १७ वर्षांचा आढावा घेतला. या महिन्यातील अंक भटकंतीवर असून संस्थेने अनेक वर्षी घेतलेल्या भटकंतीची माहिती त्यात मिळेल, असे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. मिलिंद वाटवे यांनी पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहे. त्याबद्दल त्यांनी संस्थेचे अभिनंदन करून संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. मिलिंद वाटवे यांनी जनसामान्यांच्या माध्यमातून पर्यावरण विकासाविषयी मार्गदर्शन केले, तसेच पर्यावरणीय शिक्षण संस्थाचे महत्त्व विषद करून सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन, निसर्गाकडे बघण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन, पर्यावरणाचे नेतृत्व व भांडवल यांची साखळी जुळून येणे गरजेचे आहे, असे डॉ. वाटवे यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
देवराई प्रतिष्ठानचे रघुनाथजी ढोले यांनी एका एकरमध्ये ११९ झाडांच्या विविध प्रजाती अशा एकूण ५१५ झाडे लावली, अशी देवराईची संकल्पना त्यांनी सांगितली. राम आपटे यांनी याप्रसंगी पर्यावरण दक्षता मंडळाच्या उपक्रमांना शुभेच्छा दिल्या. तसेच सामान्य नागरिकांनी त्यांच्या छोट्या-छोट्या कृतींमधून पर्यावरण संवर्धन कसे करू शकतो, याविषयी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com