सरकारी अधिकारी-वाहतूक पोलिसांची वादावादी

सरकारी अधिकारी-वाहतूक पोलिसांची वादावादी

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १० : बेशिस्त वाहनचालकांवर आरटीओच्या वतीने वारंवार कारवाई करण्यात येते; परंतु त्याचा धाक सर्वसामान्य वाहनचालकांसह सरकारी अधिकाऱ्यांनादेखील नसल्याचे चित्र रविवारी (ता. ९) सायंकाळी दिसून आले. एका सरकारी अधिकाऱ्याने नियमांचे उल्लंघन करत नो एन्ट्रीमध्ये आपले वाहन घुसवले. नियम मोडल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवत कागदपत्रांची विचारणा केली. याचा राग सरकारी अधिकाऱ्याला आला, त्याने माझी गाडी अडवण्याची हिंमत कशी झाली? असा जाब विचारत पोलिसांशी भररस्त्यात हुज्जत घातल्याची घटना घडली आहे.
कल्याण रेल्वे स्थानक परिसरात स्मार्ट सिटीअंतर्गत काम सुरू असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात सकाळ-संध्याकाळी वाहनकोंडी होते. ही कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक विभागाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्या; मात्र परिसरातील कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलिसांना यश येत नाही. त्यातच काही वाहनचालक हे वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याने या वाहतूक कोंडीत आणखीनच भर पडत असते. वाहतूक नियम मोडण्यात सर्वसामान्य नागरिकांसह सरकारी अधिकारीही मागे नाहीत. याचेच उदाहरण म्हणजे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात रविवारी सायंकाळी झालेला सरकारी अधिकारी आणि वाहतूक पोलिस यांच्यातील वाद. रेल्वे स्थानक परिसरात वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे काम वाहतूक पोलिस डी. बी. पुंड करत होते. दरम्यान, आयकर विभागातील एका सरकारी अधिकाऱ्याने नो एन्ट्रीमधून आपली गाडी घुसवत नियमांचे उल्लंघन केले. वाहन नो एन्ट्रीमधून आणल्याने पुंड यांनी ती गाडी अडवली आणि वाहनचालकाकडे कागदपत्रांची मागणी केली.

----------------
परस्परविरोधी तक्रार
आपण सरकारी अधिकारी असून आपली गाडी अडवण्याची हिंमत कशी झाली, असे म्हणत अधिकाऱ्याने वाहतूक पोलिसाला जाब विचारला. या मुद्द्यावरून वाहतूक पोलिस आणि अधिकारी यांच्यात भररस्त्यातच वादावादी झाली. जवळपास तासभर त्यांचा वाद सुरू होता. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी ऑनलाईन दंड आकारत संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई करत त्यांना रिपोर्ट पाठवला आहे. अधिकाऱ्यानेदेखील वाहतूक पोलिस उद्धट वर्तन करत असल्याचे सांगत वाहतूक पोलिसावर कारवाई करण्यासाठी लेखी तक्रार केली असल्याचे समजते. याविषयी सरकारी अधिकारी काही बोलण्यास तयार नाहीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com