राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची शरद पवारांना साथ?

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांची शरद पवारांना साथ?

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर त्याचा परिणाम मुंबईतील पक्ष संघटनेवरही झाला आहे; मात्र २०१७ च्या पालिका निवडणुकीत निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या बहुतेक नगरसेवकांचा कल शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा आहे. तरीही दोन्हीही गटांच्या कार्याध्यक्षांनी हे माजी नगरसेवक आमच्याच पाठीशी असल्याचा दावा केल्याने कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत.

मुंबईत २०१७ च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे ९ नगरसेवक निवडून आले होते. त्यापैकी एका नगरसेवकाने शिंदे गटात प्रवेश केला; तर जोगेश्वरीच्या एका नगरसेविकेवर अपात्रतेची कारवाई झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे एकूण ७ नगरसेवक राहिले आहेत. यापैकी कप्तान मलिक आणि सईद खान हे दोन नगरसेवक नवाब मलिक कुटुंबातील आहे. मलिक कुंटबाने तटस्थ भूमिका स्वीकारली आहे. पक्षाचे सात माजी नगरसेवक आमच्या पाठीशी असल्याचा दावा शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा राखी जाधव यांनी केला आहे; तर अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांनीही हे नगरसेवक आमच्या मागे असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेसारखी स्थिती होणार का?
१) एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मुंबईतील बहुसंख्य शिवसेना नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे होते; मात्र पक्ष आणि निवडणूक चिन्ह शिंदे यांच्या ताब्यात जाताच कुंपणावर बसलेल्या अनेक ठाकरे समर्थक नगरसेवकांनी ‘मातोश्री’ची साथ सोडली.
२) सध्या राष्ट्र्वादी पक्षावरही दोन्ही गटांनी दावा केला आहे. भविष्यात शिंदेंप्रमाणे राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्हाचे माप अजित पवार यांच्या पदरात पडले, तर यातील अनेक माजी नगरसेवक ज्युनिअर पवारांच्या गोटात जाण्याची शक्यताही आहे.
३) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव कायम काही पॉकेटपर्यंत मर्यादित राहिला आहे. त्यातही अजित पवार यांनी मुंबईतील पक्ष संघटनेत कधीही लक्ष घातले नव्हते. त्यामुळे हे नगरसेवक त्यांना कितपत साथ देतील याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षसंघटना आणि नगरसेवक शरद पवार यांच्या पाठीशी ठाम उभी आहे. भविष्यातही पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या साहेबांसोबत राहणार आहेत.
- राखी जाधव, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com