वडाळा स्कायवॉकवर फेरीवाले, गर्दुल्यांचे बस्तान

वडाळा स्कायवॉकवर फेरीवाले, गर्दुल्यांचे बस्तान

वडाळा, ता. ११ (बातमीदार) : वडाळा पूर्व रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला जोडण्यासाठी स्कायवॉक बांधण्यात आला आहे; मात्र सध्या या स्कायवॉकची दुरवस्था झाली आहे. छप्पर उडाले असून रोलिंगही तुटलेल्या अवस्थेत आहे; तर ठिकठिकाणी कचरा अस्ताव्यस्त पडलेला आहे. स्कायवॉकवरील दिवाबत्ती बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच फेरीवाल्यांनी बस्तान बसवल्याने स्कायवॉक एकप्रकारे गर्दुल्यांचा अड्डा बनला आहे.

स्कायवॉकचा वापर पादचारी मोठ्या प्रमाणावर करतात; मात्र या स्कायवॉकवर दिवसेंदिवस सुविधांचा अभाव आहे. त्यातच फेरीवाले, भिकारी, चोर, गर्दुल्यांचे वास्तव्य वाढल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यात फुटलेल्या फरशीमध्ये पाय अडकून अनेक प्रवासी पडतात. नागरिकांच्या सोयीसाठी करोडो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या स्कायवॉकची दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींनी स्कायवॉकच्या दुरुस्ती कामाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एमएमआरडीएने कोट्यावधी रुपये खर्च करून वडाळा पूर्वेला जोडणारा अंदाजे ८०० मीटरचा स्कायवॉक बांधला. ज्यामुळे वडाळा पश्चिम व पूर्व विभागातील हजारो पादचाऱ्यांना याचा फायदा झाला. मुंबई शहरातील सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या स्कायवॉकमध्ये वडाळा स्कायवॉकची गणना होते. मात्र या स्कायवॉकच्या देखभाल महापालिकेच्या वतीने व्यवस्थित होत नाही. ८०० मीटर लांबीच्या स्कायवॉकवर कुठेही कचरापेटीची दिसत नाही. परिणामी गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. इथून जाणारे - येणारे पादचारी स्कायवॉकवर कचरापेटी नसल्यामुळे कुठेही कचरा टाकतात. गळके छप्पर, तुटलेले रेलिंग, फुटलेल्या फरशा, दिवाबत्तीचा अभाव अशा समस्येच्या कचाट्यात सापडलेल्या स्कायवॉकची प्रशासनाने तत्काळ याची दखल घ्यावी, तसेच स्कायवॉकवर कचरा पेटी ठेवावी.तसेच सफाई कर्मचारी व सुरक्षा रक्षक नेमावा अशी मागणी नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

प्रतिक्रिया
गेल्या दोन वर्षांपासून स्कायवॉकची स्वच्छता वाऱ्यावर पडली आहे. कचरा पेटी नसल्याने सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दिवाबत्तीची नसल्याने रात्रीच्या वेळी येथून प्रवास करणे प्रवाशांना जिकरीचे झाले आहे. तसेच ऐन पावसाळ्यात स्कायवॉकवरील छप्पर उडाले आहे. रंग काम देखील अर्धवट स्थितीत आहेत. तर गरज नसतांना स्कायवॉकच्या खालील बाजूस विद्यमान सरकारने रंगीबेरंगी विद्युत रिषणाई केली आहे. या गंभीर समस्येची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ समस्येतून स्कायवॉकची मुक्तता करा.
- संजय रणदिवे, वडाळा पूर्व शाखा अध्यक्ष, मनसे

येत्या आठवड्यात स्कायवॉकवर छप्पर बसविण्यात येईल; तर येथील रंगकाम पूर्ण झाले आहे. मात्र कुठे रंगकामात काही त्रुटी असतील, तर ते पाहून काम करण्यात येईल; परंतु ऐन पावसाळ्यात रंगकाम करणे शक्य होणार नाही.
- रामदास घुगे, ब्रिज डिपार्टमेंट अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com