वाड्यातील कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी

वाड्यातील कार्यकर्ते शरद पवारांच्या पाठीशी

Published on

वाडा, ता. ११ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचे पेव राज्यभर पसरले असून गाव, शहरात फुटीचे लोण पसरले आहे; मात्र याला वाडा तालुका अपवाद ठरला आहे. वाड्यातील एकही कार्यकर्ता न फुटता सर्व जण खंबीरपणे शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत.

वाडा तालुका पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. या तालुक्यातून दिवंगत दामू शिंगडा हे अनेक वर्षे खासदार होते. माजी आमदार दिवंगत शंकर गोवारी हेही काही काळ विधानसभेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व करीत होते. त्यानंतर शरद पवार यांनी काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर अनेक कार्यकर्ते हे शरद पवार यांच्यासोबत गेले. ते आजही पवार यांच्यासोबत आहेत. दामू शिंगडा हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले. शरद पवार हे येथील पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांना नावानिशी ओळखत असून कुठल्याही सभेत कार्यकर्ते दिसल्यावर त्यांची आपुलकीने विचारपूस करतात. ही गोष्ट येथील कार्यकर्त्यांना भावली आहे. देशपातळीवरील नेता असून नावानिशी ओळखत असल्याने हे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचा विचारही करू शकत नसल्याची भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली.

तालुक्यातील नवनेतृत्वही शरद पवार यांच्या विचारधारेवर चालणारे आहे. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेस फुटून काही नेते, आमदार, खासदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले, मात्र वाड्यातील एकही कार्यकर्ता अजित पवार गटाकडे गेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर वाड्यात फूट पडेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत होता. मात्र आजवर या बंडाचा परिणाम तालुक्यातील कार्यकर्त्यांवर झालेला दिसत नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रोहिदास पाटील यांच्याशी संपर्क साधला असता वाडा तालुका हा शरद पवारांना मानणारा असून त्यामुळे एकाही कार्यकर्त्याने पक्ष सोडला नसल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.