झोपडपट्ट्या स्वच्छतेसाठी ‘ऑपरेशन रुद्र’

झोपडपट्ट्या स्वच्छतेसाठी ‘ऑपरेशन रुद्र’

Published on

भाईंदर, ता. ११ (बातमीदार) : झोपडपट्टी परिसर म्हणजे बकाल, गलिच्छपणा असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. शहरातील झोपडपट्ट्यांचे हे चित्र बदलण्यासाठी मिरा-भाईंदर महापालिकेने ‘ऑपरेशन रुद्र’ हे अभियान हाती घेतले आहे. भाईंदर पश्चिम येथील दोन झोपडपट्ट्यांसाठी हा उपक्रम सुरुवातीला राबवण्यात येत आहे.

भाईंदर पश्चिम भागातील गणेश देवलनगर व जय अंबेनगर येथे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्या एकमेकाला लागूनच असून त्यातून सांडपाणी वाहून नेणारा एक मोठा नाला वाहतो. या नाल्याची महापालिकेने अनेकवेळा स्वच्छता केली तरी प्रत्येकवेळी तो कचऱ्याने भरलेला असतो. या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे रहिवासी घरातील सर्व कचरा या नाल्यातच टाकतात. परिणामी परिसरात दुर्गंधी पसरते, तसेच रहिवाशांना आजारही होतात. यासाठी या दोन्ही झोपडपट्ट्यांच्या परिसरात स्वच्छता राखण्यासाठी ‘ऑपरेशन रुद्र’च्या (रॅपिड अर्बन डेव्हलपमेंट अॅण्ड रिजुवेनेशन ॲक्शन) माध्यमातून विशेष मोहीम राबवण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

सहायक स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती होणार
झोपडपट्ट्यांमधील प्रत्येक गल्लीसाठी सहायक स्वच्छता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कचरा टाकण्यासाठी प्रत्येक भागात वीस लिटर क्षमतेचे दोन डबे ठेवण्यात येत आहेत. सहायक स्वच्छता निरीक्षक दररोज सकाळी व सायंकाळी घरोघरी जाऊन घरातील कचरा नाल्यात अथवा रस्त्यावर न टाकता कचऱ्याच्या डब्यात टाका, असे आवाहन करणार आहेत. कचऱ्याच्या डब्यांची जबाबदारीदेखील स्थानिकांवरच देण्यात आली आहे. अशा पद्धतीने दोन आठवडे रहिवाशांमध्ये जनजागृती केली जाणार आहे. त्यानंतर कचरा नाल्यात अथवा रस्त्यात टाकला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

जागृतीसाठी विद्यार्थ्यांची मदत
याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांकडून पथनाट्य, जनजागृती फेरी याचेही आयोजन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे झोपडपट्ट्यांच्या परिसरात असलेल्या सर्व दुकानदारांना प्लास्टिकच्या पिशव्या न विकण्याची ताकीद देण्यात आली आहे.

सुरुवातीला गणेश देवलनगर आणि जय अंबेनगर या झोपडपट्ट्यांमध्ये ऑपरेशन रुद्र राबवण्यात येणार आहे. आयुक्त दिलीप ढोले यांच्या हस्ते या मोहिमेची सुरुवात केली जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी ठरला तर ज्या झोपडपट्ट्यांमधून नाले वाहतात, तसेच सर्वाधिक अस्वच्छता आहे, अशा ठिकाणीदेखील ही मोहीम सुरू करण्यात येईल.
- रवी पवार,
उपायुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.