मुंबईतील १३ टक्के सरकारी कर्मचारी लठ्ठ

मुंबईतील १३ टक्के सरकारी कर्मचारी लठ्ठ

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : राज्यात लठ्ठपणाबाबत शासनाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान मुंबईतील सरकारी कार्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारीही लठ्ठ असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील तीन सरकारी कार्यालयांमध्ये नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात १३ टक्के सरकारी कर्मचारी लठ्ठ असल्याचे आढळून आले आहे. डॉक्टरांनी या कर्मचाऱ्यांना लठ्ठपणा टाळण्यासाठी टिप्सही दिल्या असून पुढील तपासणीसाठी त्यांना सरकारी रुग्णालयात पाठवले आहे.
राज्यातील नागरिकांमध्ये वाढत्या लठ्ठपणाची समस्या लक्षात घेऊन राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने ‘लठ्ठपणा : जनजागृती आणि उपचार’ हे अभियान सुरू केले आहे. राज्यात ४ मार्चपासून सुरू झालेल्या या मोहिमेत शालेय विद्यार्थ्यांची पहिली तपासणी करण्यात आली. यानंतर १९ ते २६ जून या कालावधीत राज्यातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत प्रत्येक शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांना त्यांच्या जवळील तीन शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वजन, उंचीच्या आधारे बॉडी मास्क इंडेक्स, मधुमेह आणि रक्तदाब तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
................................
५१ टक्के कर्मचाऱ्यांचे वजन जास्त
जे जे रुग्णालयाच्या माध्यमातून माझगावचे जीएसटी भवन, डोंगरीचे बालसुधारगृह आणि नागपाडा येथील अतिरिक्त पोलिस महासंचालक कार्यालयात कार्यरत असलेले पोलिस कर्मचारी असे एकूण १९० कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली. या वेळी जे जे रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले, की या १९० कर्मचाऱ्यांपैकी ५१ टक्के म्हणजेच ९७ कर्मचाऱ्यांचे वजन जास्त आहे. याशिवाय २७ कर्मचारी उच्च रक्तदाबाने; तर १८ कर्मचारी मधुमेहाने त्रस्त असल्याचे आढळून आले आहे. यासोबतच ५० कर्मचारी मधुमेहाच्या विळख्यात सापडले आहेत.
.....................
अधिष्ठात्यांच्या म्हणण्यानुसार
जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठात्या डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले, की राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सूचनेवरून रुग्णालयाच्या आजूबाजूच्या तीन सरकारी कार्यालयांमध्ये तपासणी करण्यात आली. या कर्मचाऱ्यांना लठ्ठपणा टाळण्यासाठी टिप्सदेखील देण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये व्यायाम करणे इत्यादींचा समावेश आहे. यासोबतच त्यांना इतर आजारांसाठी रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
.................................
लठ्ठ रुग्णांपैकी ९० टक्‍के लठ्ठ रुग्ण डॉक्टरांच्या सूचनेनुसार उपचार करण्यास उशीर करतात आणि त्यामुळे त्यांना अनेक गुंतागुंतींसह गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. लठ्ठपणाच्या वाढत्या घटनांमागे शारीरिक हालचालींचा अभाव, तणाव आणि अस्वस्थ आहार ही प्रमुख कारणे आहेत.
ाडॉ. शशांक शाह, लॅप्रोस्कोपिक बॅरिएट्रिक सर्जन.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.