मुरबाड आगाराची रखडगाथा

मुरबाड आगाराची रखडगाथा

मुरबाड ता. ११ (बातमीदार) : मुरबाड एसटी बस डेपोच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम गेली तीन वर्षे रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच आगारात कोणतीही बसण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना पावसातच बसची वाट पाहावी लागते. यामुळे अनेक प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती दर्शवतात. चांगल्या स्थितीत असलेले आगार नूतणीकरणासाठी तोडण्यात आले; मात्र त्याचे काम पूर्णच होत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत. आगाराचे काम तीन वर्षे रेंगाळल्याने कंत्राटदाराला काळ्या यादी टाकण्यात आले; मात्र नूतनीकरणाचे काम कधी पूर्ण होणार हे अनुत्तरितच आहे. याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होऊन एसटीचे उत्पन्न घटत आहे.

मुरबाड बस आगारात कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. कल्याण फलाटावर बस लागल्यावर तेथून उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढण्यासाठी दुसऱ्या फलाटावरून उतरावे लागते. मुरबाड, कल्याणकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना पुरेशा बस मिळत नसल्याने बरेच जण खासगी वाहनातून प्रवास करतात. तसेच कंत्राटदार अयशस्वी ठरल्याने आता या कंत्राटदाराचे नाव काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्याचबरोबर आता पुन्हा या नूतनीकरणाच्या कामाचे टेंडर निघणार आहे, त्यानंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मुरबाड आगार अधिकाऱ्यांनी दिली आहे; मात्र या पावसाळ्यात तरी प्रवाशांना हा नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे किमान सहा महिने प्रवाशांना गैरसोय सहन करावी लागेल.

आगारातील उपाहारगृह व स्वच्छतागृहाची अत्यंत वाईट अवस्था आहे. संरक्षक भिंत काही ठिकाणी कोसळली आहे. तसेच मोठा पाऊस झाल्यास ती कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच यामुळे दुर्घटनाही घडू शकते. याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या समस्यांची दखल घेऊन तात्पुरती डागडुजी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. तसेच मुरबाड आगारातून माळशेज घाटमार्गे नगर, जुन्नर, शिर्डी तसेच कल्याण, कर्जत, बदलापूर, शहापूरकडे दररोज मोठ्या संख्येने एस टी बस जातात, पण प्रवाशांना चांगल्या मूलभूत सुविधा मिळत नाहीत, अशी प्रवाशांची तक्रार आहे. या प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करण्यासाठी सकाळच्या ठराविक वेळेत मुरबाड आगारातून; तर सायंकाळी कल्याण आगारातून बस सोडाव्यात अशीही मागणी होत आहे.

खासगी वाहनांनी प्रवास
राज्य शासनाने महिलांसाठी अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास करण्याची सवलत जाहीर केली आहे. त्याला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे; मात्र त्याला अपवाद ठरले आहे ते मुरबाड आगार. आगारात असुविधा असल्याने तसेच एस टी बसच्या फेऱ्या कमी असल्याने ही सवलत कागदावर राहिली आहे. अनेक महिला, विद्यार्थी, खासगी वाहनांनीच प्रवास करण्यास पसंती दर्शवत आहेत.


प्रतिक्रिया
मुरबाड-कल्याण बस फेऱ्या हे मुरबाड आगाराचे उत्पन्नाचे मोठे साधन आहे, पण बस फेऱ्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने प्रवासी खासगी वाहनाने प्रवास करतात. मुरबाड-कल्याण मार्गावर सहा बसमार्फत अठरा फेऱ्या नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच मानव विकास योजनेंतर्गत आणखी पाच नवीन बस गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. या गाड्या उपलब्ध होताच फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे. योगेश मुसळे, मुरबाड आगार व्यवस्थापक


मुरबाड एस टी आगारात प्रवाशांना बसण्यासाठी चागली जागा नसल्याने उभे राहून बसची वाट पाहावी लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com