उलवेत खड्ड्यांमुळे अपघातसत्र

उलवेत खड्ड्यांमुळे अपघातसत्र

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. ११ ः सिडकोतर्फे मोठ्या प्रमाणात विकास करण्यात येत असलेल्या उलवे नोडकडे झालेल्या दुर्लक्षामुळे रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. या नोडमधील सर्वच रस्त्यांवर महानगर गॅसतर्फे खोदकाम केल्यामुळे दुरवस्था झाली आहे. मे महिन्यात रस्त्यावर केलेले खोदकाम पावसापूर्वी भरले नसल्यामुळे खड्ड्यांमध्ये तळे साचले आहेत. या खड्ड्यांतून वाहने चालवताना अंदाज येत नसल्याने उलव्यातील रस्ते दुचाकीस्वारांसाठी अपघातांना कारण ठरत आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दृष्टीने उलवे हा सर्वात महत्त्वाचा नोड आहे. भविष्यात नवी मुंबई विमानतळाचे प्रवेशद्वार असलेल्या नोडच्या दिशेने आहे. तसेच वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूसुद्धा याच नोडमधून जात असल्याने उलवे नोडला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सिडकोतर्फे उलवे नोडमध्ये पाच हजारपेक्षा जास्त घरे उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. उलव्याचा बहुअंगाने विकास होत असताना, रस्ते विकास वाऱ्यावर सोडला आहे. उलवे परिसरातील सेक्टर २२, २३, कोपरी गाव या भागात नागरिकांना चालण्यासाठी रस्ता शिल्लक राहिला नाही. रस्त्यावरचे डांबर जाऊन मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांतून दुचाकींऐवजी मोठे ट्रकसुद्धा एखाद्या होडीप्रमाणे चालतील, अशी अवस्था झाली आहे. सेक्टर २१, २, ९ आणि १९ या भागातही मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे रोज खड्ड्यांमध्ये अपघात होत आहेत. काही खड्डे तर एवढे मोठे आहेत. अशा खड्ड्यांमधील वाहन चालवताना दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या प्रकरणी उलवे नोडचे कार्यकारी अभियंता मनोज वाळिंबे यांच्याशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
----------------------------------
रिक्षाचालकांची प्रवाशांशी अरेरावी
खड्ड्यांमुळे अनेक रिक्षाचालक संध्याकाळी कार्यालयातून परतणाऱ्या नागरिकांना घरी सोडायला तयार नसतात. उलवेमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात इमारत उभारणीची कामेही सुरू आहेत. या कामांसाठी रोज खडी, सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याने भरलेले ट्रक रस्त्याने ये-जा करीत असतात. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांना कोणी वाली नसल्याचे हालत झाली आहे.
------------------------------
सिडकोच्या निविदा प्रक्रियेला अल्प-प्रतिसाद
उलवे भागातील बहुतांश नोडमध्ये पडलेले खड्डे आणि रस्त्याची झालेली दुरवस्था पूर्ववत करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली जात आहे. त्याकरिता सिडकोने काही कोटींचे खर्च असणारे निविदा प्रक्रियाही राबवली होती; परंतु, तीन वेळा प्रक्रिया करूनही कोणी कंत्राटदार आलेला नाही.
-----------------------------
घरातील किराणाचे सामान घेऊन परतत घरी परतत असताना सेक्टर २३ मध्ये खड्ड्यांमुळे दुचाकीचा अपघात झाला. आम्ही दोघेही रस्त्यावर पडलो. माझ्या पतीला आणि मला मार लागला. उलवे नोडमध्ये सिडकोने लोकांना घरासोबत खड्डेसुद्धा दिल्याने सिडकोचे आभारी आहोत.
- शुभांगी पवार, अपघातग्रस्त गृहिणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com