निर्देशांकांची सलग दुसरी वाढ

निर्देशांकांची सलग दुसरी वाढ

मुंबई, ता. ११ : जागतिक शेअर बाजारांमधील सकारात्मक वातावरणामुळे आज भारतीय शेअर बाजारांनी सलग दुसऱ्या दिवशी सुमारे अर्धा टक्का नफा दाखवला. आज सेन्सेक्स २७३.६७ अंश; तर निफ्टी ८३.५० अंश वाढला.

जागतिक शेअर बाजार नफा दाखवत असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली. दुपारपर्यंत शेअर बाजार चांगलेच नफ्यात होते. सेन्सेक्स ६६ हजारांच्या जवळ म्हणजे ६५,८७० अंशापर्यंत गेला होता. मात्र आज बँका तसेच बड्या वित्तसंस्थांमध्ये नफावसुली झाल्यामुळे नंतर बाजारात घसरण झाली; तरीही बाजाराचा कल सकारात्मक असल्यामुळे बाजार नफ्यातच बंद झाले. दिवसाअखेर सेन्सेक्स ६५,६१७.८४ अंशावर; तर निफ्टी १९,४३९.४० अंशांवर बंद झाला.

उद्यापासून सुरू होणाऱ्या तिमाही निकालांच्या प्रतीक्षा आता भारतीय शेअर बाजार आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी चीन आर्थिक पॅकेज जाहीर करेल तसेच अमेरिकेतील चलनवाढही आटोक्यात राहील, या अपेक्षेवर आज जागतिक शेअरबाजार नफा दाखवीत होते. आज बड्या बँका आणि वित्तसंस्थांच्या शेअरमध्ये नफावसुली झाली, तरीही निफ्टी १९,४००च्या खाली गेला नाही. तसेच सेन्सेक्सही ६५ हजार पाचशेच्या खाली गेला नाही; तर यापुढेही परकीय वित्तसंस्थांच्या निधीची आवक तसेच समाधानकारक मान्सून यामुळे बाजार नफ्यातच राहील, असे तज्ज्ञ सांगत आहेत. सुरुवातीला निकाल जाहीर करणाऱ्या आयटीच्या शेअरवर तसेच भारत आणि अमेरिकेच्या चलनवाढीवरही गुंतवणूकदारांचे लक्ष राहील, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

आज सेन्सेक्समधील सन फार्मा अडीच टक्के वाढला; तर मारुती, टाटा मोटर, आयटीसी, इन्फोसिस, एशियन पेंट, नेस्ले, टायटन या शेअरचे भाव दीड टक्का वाढले; तर बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, बजाज फिन्सर्व, आयसीआयसीआय बँक या अर्थसंस्थांच्या शेअर्स भाव गडगडले.

--
पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण करार अपेक्षित असल्याने या क्षेत्रातील शेअरवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. गेले सहा दिवस निफ्टी १९,४०० ते १९,५०० अंशांच्या पट्ट्यात फिरत असून तळाच्या भावाला जोरदार खरेदी होत आहे. त्यामुळे बाजाराचा कल सकारात्मक राहील, असा अंदाज आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com