वृत्तपत्राच्या वाहनाला ट्रकची धडकः चारजण ठार

वृत्तपत्राच्या वाहनाला ट्रकची धडकः चारजण ठार

सकाळ वृत्तसेवा
करंजी/ पांढरकवडा, ता. ११ : करंजीपासून दोन किलोमीटर अंतरावर कोठोडा येथे मंगळवारी (ता. ११) पहाटे ६.१५ च्या सुमारास वणीकडून करंजीकडे येणाऱ्या ओमनी कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात ट्रकने भीषण धडक दिली. यात कारचा चेंदामेंदा होऊन तीन जण जागीच ठार झाले; तर एक जण उपचारांदरम्यान यवतमाळ शासकीय रुग्णालयात दगावला. ही घटना राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा पुलावर घडली.

ही कार (क्र. एमएच ३४ के १९५४) नागपूरवरून मराठी दैनिक वृत्तपत्राचे पार्सल घेऊन वणी-मारेगावहून पार्सल वाटप करीत करंजीकडे येत असताना राज्य महामार्गावर असलेल्या कोठोडा येथील अरुंद पुलाजवळ अज्ञात ट्रकने कारला जबर धडक दिली. या भीषण अपघातात कारचा पुढील भाग चेंदामेंदा होऊन तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले असता उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटना घडताच ट्रकचालक ट्रकसह घटनास्थळाहून पळून गेला. कारचालक किशोर बोरकर (रा. आनंद चौक, वरोरा, जि. चंद्रपूर), पुरुषोत्तम विठ्ठल नारायणे (वय ५०, रा. इंद्रायणी नगर, वरोरा) रतन तुळशीराम खोडेकर (रा. डीगशे, ता. राळेगाव) या तिघांचा जागीच मृत्यू झाला; तर निकेश हसन आत्राम (वय १९, रा. चंदनखेडा, ता. भद्रावती) हा गंभीर जखमी. याला यवतमाळ येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्याचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. कारमध्ये अडकलेले मृतदेह काढण्यासाठी जेसीबी व ट्रकची मदत घेण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मृतदेह पांढरकवडा येथे उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. पुढील तपास पांढरकवडा पोलिस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com