मेट्रो कामामुळे रस्त्यावर खड्डे

मेट्रो कामामुळे रस्त्यावर खड्डे

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : मिरा-भाईंदर शहरात मेट्रोचे काम जोरात सुरू आहे; मात्र त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमधून मार्ग काढताना नागरिकांची अक्षरश: तारांबळ उडत आहे. याव्यतिरिक्त शहरातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील खड्डे पडल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मिरा-भाईंदर शहरात दहिसर चेक नाका ते भाईंदर पश्चिम या मुख्य मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग, काशी-मिरा ते गोल्डन नेस्ट चौक या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शहरातील वाहतुकीचे हे मुख्य रस्ते असल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोचे काम सुरू असलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आहे. मात्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना खड्डे बुजवण्यास सांगण्यात आल्यानंतरही रस्त्यावर खड्डे कायम आहेत. मेट्रोमुळे रस्त्याची नादुरुस्ती झाल्याचे हे काम कंत्राटदाराकडे आहे. मध्यंतरी आमदार प्रताप सरनाईक यांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती, त्यावेळी रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही.

शहरातील अंतर्गत भागातील रस्त्यांवरही ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. हे खड्डे भरण्यासाठी महापालिका वेट मिक्स काँक्रिट, रॅपिड हार्डनिंग काँक्रीट, कोल्ड मिक्स डांबर व मास्टिक अस्फाल्ट या पद्धतीने खड्डे भरण्याचे काम करत आहे. मात्र त्यासाठी पावसाने थोडी उसंत घेणे आवश्यक आहे. सध्या पाऊस पडत असल्यामुळे हे खड्डे खडी आणि ग्रीट पावडरच्या साह्याने भरण्यात येत आहेत, मात्र पावसाचा जोर वाढताच पुन्हा ते उखडत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे.

खड्डे बुजवण्याच्या पद्धती-
- वेट मिक्स काँक्रीट पद्धतीत सुके काँक्रीट खड्ड्यात भरून ते रोलरच्या साह्याने दाबले जाते. यामुळे खड्डे बरेच दिवस उखडत नाहीत. कोल्ड मिक्स डांबर व मास्टिक अस्फाल्टसुद्धा खड्ड्यांसाठी वापरण्यात येत आहे.

- रॅपिड हार्डनिंग काँक्रीटमध्ये काँक्रिट आणि रसायनाचा वापर केला जातो. या पद्धतीने काँक्रीट खड्ड्यांमध्ये एकदम पक्के बसते व खड्डे पुन्हा पडत नाहीत; मात्र ही पद्धत महागडी असल्यामुळे केवळ मुख्य रस्त्यावरील खड्ड्यांसाठीच वापरण्यात येते.

शहरात पावसाळा येताच खड्ड्यांची समस्या वाढते. अनेक ठिकाणी कोंडी होत असल्याने प्रवासासाठी २० मिनिटे अगोदरच घराबाहेर पडतो; मात्र संध्याकाळच्या वेळी प्रवासात जास्त वेळ खर्ची होतो.
- सागर पवार, वाहनचालक

खड्डे भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीसाठी किमान पाच ते सहा तास पाऊस न पडणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व खड्डे बुजवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पावसाने थोडी उसंत घेताच दोन दिवसांत हे काम करण्यात येईल. तसेच मेट्रोचे काम करणाऱ्या कंत्राटदारालाही खड्डे तातडीने दुरुस्त करण्यास सांगण्यात आले आहे.
- दिलीप ढोले, आयुक्त, मिरा-भाईंदर महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com