सागर इन्व्हेस्टमेंटमधील गुंतवणूकदारांची ईडीकडे धाव

सागर इन्व्हेस्टमेंटमधील गुंतवणूकदारांची ईडीकडे धाव

Published on

बदलापूर, ता. १८ (बातमीदार) : सहा वर्षांपूर्वी बदलापुरात सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीत झालेल्या घोटाळ्याने शहरातील वातावरण ढवळून निघाले होते; मात्र यातील गुंतवणूकदारांना न्याय मिळाला नसल्याने त्या वेळी गुंतवणूकदारांच्या पाठीशी उभे राहत न्याय मिळवून देणार असे आश्वासन आमदार व लोकप्रतिनिधी यांनी दिले होते; मात्र त्यांनीदेखील पाठ फिरवल्यामुळे पीडित गुंतवणूकदार आता गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून, या प्रकरणाची चौकशी ईडीमार्फत व्हावी अशी मागणी करण्यात येणार आहेत.
बदलापुरातील श्रीराम समुद्र यांनी सागर इन्व्हेस्टमेंट या नावाने गुंतवणूक कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत मागील ३० वर्षांपासून शहरातील सामान्यांपासून ते नामांकित व्यक्तींपर्यंत तीन हजार ५०० लोकांनी तब्बल १७० कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती; मात्र नोटाबंदीच्या काळात या कंपनीचा डोलारा कोसळला आणि गुंतवणूकदारांना त्यांचे व्याजाचे पैसे मिळणे बंद झाले. हा प्रकार समोर आल्यानंतर पैसे परत मिळण्याची शाश्वती नसल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी उघडपणे या कंपनीविरोधात फसवणूक झाल्याचे सांगितले. यासंदर्भात सुहास समुद्र, सुनीता समुद्र, श्रीराम समुद्र, अनघा समुद्र आणि भक्ती समुद्र यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली; मात्र काही काळानंतर या सगळ्यांची जामिनावर सुटकादेखील करण्यात आली.


------------
दीडशे कोटी गेले कुठे?
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे; मात्र या प्रकरणात आतापर्यंत कंपनीकडून फक्त २७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे; मात्र १७० कोटींपैकी २७ कोटींची मालमत्ता वजा करता उर्वरित दीडशे कोटी गेले कुठे, असा प्रश्न आता हे गुंतवणूकदार उपस्थित करत आहेत. यात स्थानिक आमदार किसन कथोरे त्याचबरोबर शहरातील काही लोकप्रतिनिधी यांनीदेखील गुंतवणूकदारांच्या पाठीशी आम्ही आहोत. यासंदर्भात न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी आश्‍वासने दिली होती; मात्र अद्यापपर्यंत या गुंतवणूकदारांना न्याय मिळालेला नाही.

--------------
समुद्र कुटुंबाची चौकशी का नाही?
राज्यातच नव्हे, तर देशभरात अनेक बड्या बड्या व्यक्तींवर ईडीची चौकशी लावण्यात आलेली आहे. मग बदलापुरात झालेल्या १७० कोटी घोटाळ्यासाठी समुद्र कुटुंबावर ईडीची चौकशी का लावली जात नाही? हे कुटुंब जामिनावर सुटून आरामात जीवन जगत आहे. आम्ही मात्र आमच्या कष्टाचे, मेहनतीचे पैसे परत मिळतील की नाही याच विवंचनेत अडकलो आहोत. त्यामुळे पुन्हा एकदा स्वतःसाठी, स्वतःच्या न्यायासाठी उभे राहत, आम्ही लवकरच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे गुंतवणूकदार श्रीकांत चिमुरटे, तुषार बिवलकर, संध्या साळुंखे कदम, उषा मालगुंडकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.