सुदृढ मनासाठी उत्तम पुस्तकांची गरज

सुदृढ मनासाठी उत्तम पुस्तकांची गरज

Published on

सुदृढ मनासाठी उत्तम पुस्तकांची गरज
एकनाथ आव्‍हाड यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. २६ ः मन सुदृढ करण्यासाठी उत्तम पुस्‍तकांची गरज असते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, कथाकार एकनाथ आव्हाड यांनी केले आहे. विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचालित विकास हायस्कूल येथे सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प. म. राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त जी-२० अंतर्गत ‘गप्पा बालसाहित्यिकांशी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्‍यावेळी विद्यार्थी वर्गासोबत गप्पा मारताना आव्हाड यांनी पुस्‍तकांचे महत्त्‍व सांगितले.
विकास हायस्कूल विक्रोळी येथे नुकताच झालेला जी-२० इन एज्युकेशनच्या अनुषंगाने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता गप्पा बाल साहित्यिकांशी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत साहित्य अकादमीचा सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कारप्राप्त एकनाथ आव्हाड यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम मुख्याध्यापिका वैष्णवी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही मुलाखत शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली होती. विद्यार्थ्यांना समजेल अशा शैलीत एकनाथ आव्हाड यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. अतिशय ओघवत्या भाषेत कथा, कविता सादर करीत विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आव्हाड यांनी दिली. विद्यार्थ्यांचे हसरे-नाचरे-बोलके डोळे, आनंदी चेहरे, उदास चेहरे, मुलांच्या मनातील उत्सुकता ही कवितेमागची प्रेरणा असते, असे त्यांनी सांगितले. मन सुदृढ करायचे असेल तर उत्तम पुस्तकांची गरज आहे, ते मनाला नकळत चांगले विचार देऊन जातात. चांगल्या विचारांतून आचार वाढतो. पुस्तकांशिवाय घर म्हणजे दार-खिडक्यांशिवाय घर असते. पुस्तक शिक्षणातून माणूसपण जपायला शिकवते. अद्भुत जगामध्ये घेऊन जाते, असे विचार आव्हाड यांनी सहज पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले.

इतरही उपक्रम
विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीचा विकास बालसाहित्याच्या माध्यमातून करणे, त्यांना वाचनाची आवड निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये सभाधीटपणा निर्माण करणे, संवाद कौशल्य विकसित करणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू होता. यानिमित्त एकनाथ आव्हाड यांच्या कवितांबरोबरच इतरही बालकवितांची पुस्तके विद्यार्थ्यांना अवलोकनार्थ मांडण्यात आली होती. विद्यार्थ्यांचे गट करून या पुस्तकातील कवितांचा आस्वाद दिवसभर विद्यार्थ्यांनी घेतला. त्यातील प्रसंग अनुभवले. स्वतःही काही कविता करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. या कार्यक्रमामध्ये पालकही सहभागी झाले होते.

यांची उपस्थिती
मुलाखतीच्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांनी वेगळाच प्रेरणादायी अनुभव घेतला, असे मत पालकांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्था प्रतिनिधी मेघा परब, संस्थेचे शैक्षणिक सल्लागार सुदाम कुंभार उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष प. म. राऊत यांच्याप्रती अभीष्टचिंतन व्यक्त करीत असताना संस्थेच्या शैक्षणिक ध्येय व उद्दिष्टांना अनुसरून विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांसाठी प्रेरणादायी असा हा मुलाखतीचा उपक्रम आयोजित केल्याबद्दल चिटणीस डॉक्टर विनय राऊत यांनी समाधान व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.