वाहतूक कोंडीमुळे लेटमार्क

वाहतूक कोंडीमुळे लेटमार्क

Published on

खारघर, ता. २६ (बातमीदार) : शिल्प चौकाकडून सेक्टर बाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत असून वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणारे चाकरमानी हैराण झाले असून लेटमार्क लागत असल्याने नाराजीचा सूर आहे.
खारघर सेक्टर १२, १३, २० आणि २१ कडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी शिल्प चौक उभारले आहे. एका बाजूला सेक्टर बाराच्या कोपऱ्यात फडके उद्यान उभारले आहे. शिल्प चौकाकडून सेक्टर बाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला द पॅसिपिक कमर्शियल इमारत आहे. इमारतीच्या तळमजल्यावर खाद्य पदार्थ, दुकान, मोबाईल शॉप, कटलरी, ड्रेस मटेरिअल, रुग्णालय, तसेच काही कार्यालये आहेत. या दुकानांतील व्यापारी, दुकानदार, तसेच खरेदीसाठी येणारे ग्राहक शिल्प चौकाकडून सेक्टर बारा आणि तेराकडे जाणाऱ्या रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ वाहतूक कोंडी होत असते. विशेषतः हा रस्ता अरुंद आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहने काढताना चालकांमध्ये रोज वादावादीचे प्रसंग उद्भवत असल्याने वाहतूक विभागाने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
-------------------------------------------
बेलपाड्यात सकाळ-संध्याकाळ कोंडी
खारघरमधील बेलपाडाकडून सीबीडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी वाहनांची वर्दळ असते. बेलपाडा गावालगत असलेल्या रस्त्यावर बेकायदेशीर वाहने उभी केली जातात. या रस्त्यावर तीन पदरी रस्ता आहे. मात्र, बेकायदा प्रवासी वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्यामुळे सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच या वेळेत स्कूल बस, तसेच खारघरमधून सीबीडीकडे सकाळी नोकरी, तसेच शाळा महाविद्यालयांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
------------------------------------------------
बस पकडण्यासाठी धावपळ
खारघरच्या विकासात वाढ होत असताना एनएमएमटी आणि बेस्टच्या बस शिल्प चौक, सेक्टर बारा, गोखले शाळा, केंद्रीय विहारमार्गे नवी मुंबईत ये-जा करतात. दरम्यान, दररोज होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे बेस्ट आणि एनएमएमटी प्रशासनाने मार्ग बदलल्याने सेक्टर बारामधील प्रवाशांना शिल्प चौक, अथवा केंद्रीय विहार येथील बस थांब्यावर जावे लागते.
----------------------------------------------
खारघरमधील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. अनेक ठिकाणी सम-विषम पार्किंगची अंमलबजावणी केली जात आहे. तरीही वाहने पार्क केली जात असतील तर कारवाई केली जाईल.
- तिरुपती काकडे, उपायुक्त, वाहतूक विभाग, नवी मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.