मुंबई-नाशिक प्रवास कोंडीच्या विळख्यात

मुंबई-नाशिक प्रवास कोंडीच्या विळख्यात

पंढरीनाथ कुंभार : सकाळ वृत्तसेवा
भिवंडी, ता. २६ : गेल्या आठ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबई-नाशिक महामार्गासह या महामार्गास जोडणाऱ्या इतर मार्गांवर मोठ्या संख्येने खड्डे पडले आहेत. यामुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. तसेच या मार्गावर वाहनांची गती मंदावली आहे. अशात मंगळवारी सायंकाळनंतर माणकोली ते वसई महामार्गावरील धावणारी वाहने शहरातून जात असल्याने शहरातील नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.
मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी हद्दीतील सोनाळे ते खारेगाव, माणकोली ते वसई मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने महामार्गावरील जाण्या-येण्याच्या दोन्ही मार्गिकेवर वाहतूक कोंडी होत आहे, तर जुना मुंबई-आग्रा महामार्गावरील कशेळी ते अंजूरफाटा येथेही रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. या भागात अनेक मोठमोठी गोदामे असल्याने त्यामध्ये अवजड वाहनांनी मालाची ने-आण केली जाते. ही अवजड वाहने सुमारे ४० फूट लांबीची असल्याने ते पाणी साचलेल्या खड्ड्यातून मंद गतीने चालत असल्याने वाहतूक कोंडीत वाढ होत आहे. राहणाळ गावातील होलिमेरी स्कूल, दापोडी गाव, वळगाव, काल्हेर आदी भागांत मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनांना त्यामधून वाट काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अंजूरफाटा येथे असलेला भिवंडी रोड रेल्वे स्टेशनचा रेल्वे पुलाखालीही वाहतूक कोंडी होत आहे.
……
यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या मार्गाचा विकास आराखडा तयार केल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर रस्ते दुरुस्ती शासनाचा महामार्ग विभाग करीत आहे. माणकोली ते वसई महामार्ग महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे, तर कशेळी ते अंजूरफाटा हा मार्ग एमएमआरडीएकडे आहे. शासनाच्या अशा तीन विभागांकडे हे मार्ग असल्याने त्यामध्ये सुसूत्रता नाही. परिणामी त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
……
दुभाजक नसल्याचा फटका
माणकोली ते अंजूरफाटा-वसई या महामार्गावर काही ठिकाणी दुभाजक नाही. त्यामुळे वाहने कोठेही वळणे घेत असल्याने वाहतूक कोंडी होते; तर मुंबई-नाशिक महामार्गावर असलेल्या गावांना अंडरपास केल्यास छोट्या वाहनांना पर्याय मिळू शकतो. त्यामुळे वाहतूक कोंडीसह अपघातांचे प्रमाण कमी करता येणे शक्य आहे. या मार्गावर ओवळी ग्रामपंचायत प्रवेशद्वारापासून महामार्गालगत अंडरपास करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. या मार्गावरील रांजणोली येथे शहराच्या नाल्यामधून येणारे पाणी रस्त्यावर साचून राहिल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
-----
भिवंडीतून जाणाऱ्या मुंबई-नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे आणि अवजड वाहनांची गर्दी यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. बंद वाहने ताबडतोब रस्त्याच्या बाजूला काढली जात आहेत, पण खड्ड्यामुळे वाहनांचा वेग कमी झाल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच वाहनांची संख्या जास्त असल्याने, तसेच काही ठिकाणी कामे सुरू असल्याने कोंडीत भर पडत आहे.
- आप्पासाहेब जानकर, पोलिस निरीक्षक, कोन वाहतूक विभाग
----
गोदाम पट्ट्यातील रस्त्यावर ठिकठिकाणी गटाराचे पाणी रस्त्यावर साचल्याने वाहनचालक संथ गतीने वाहने चालवितात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. माणकोली-कशेळी ते अंजूरफाटा या दोन मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ४५ अधिकारी व कर्मचारी यांच्यासह वार्डन कार्यरत आहेत.
- श्रीकांत सोंडे, पोलिस निरीक्षक, नारपोली वाहतूक पोलिस विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com