पोलिसात तक्रार केल्याचा रागातून अपहरण

पोलिसात तक्रार केल्याचा रागातून अपहरण

Published on

मनोर, ता. २६ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाचा वापर करत कामे करून देण्याच्या प्रलोभनाने बोईसरमध्ये अनेकांची फसवणूक केली जात आहे. शहरातील शिंदे गटाच्या सौरभ आप्पा नामक कार्यकर्त्याकडून एका तरुणाच्या मालकीचे वाहन भाड्याने घेऊन केलेल्या फसवणुकीविरोधात दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याचे अपहरण करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बोईसर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

सुमित सिंग (रा. बोईसर) याची कार सौरभ आप्पा याने दीड हजार रुपये प्रतिदिवसाने भाडेतत्त्वावर वापरण्यास घेतली होती. सहा महिने भाडेतत्त्वावर कार वापरल्यानंतर भाड्यापोटी ठरवलेली रक्कम देण्यास सौरभ आप्पा टाळाटाळ करत होता. वारंवार मागणी करूनही भाड्याची रक्कम दोन लाख रुपये आणि कार परत करत नव्हता. सुमित आणि त्याच्या वडिलांच्या तगाद्यानंतर ६० हजार रुपये दिले. मात्र भाड्याची उर्वरित रक्कम आणि कार परत करण्यास नकार देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत ओळख असल्याने, माझे कोणीही वाकडे करू शकणार नाही. माझ्याविरोधात तक्रार केल्यास बोईसरमध्ये तुमची कार फिरू देणार नाही, अशी धमकी दिली होती. हे संभाषण समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. फसवणुकीविरोधात सुमित याने सौरभ आप्पाविरोधात पालघरचे पोलिस अधीक्षक आणि बोईसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

अपहरण करून मारहाण
फसवणूकप्रकरणी सुमित याने बोईसर पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा राग धरून मंगळवारी (ता. २५) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास काही गुंडांनी बोईसरच्या अवधनगर परिसरातून त्याचे कारमधून अपहरण करून त्याला दुचाकीवर बसवून नेले. यशवंतसृष्टीलगतच्या सियाराम कंपनीच्या रस्त्यावर निर्जन ठिकाणी मारहाण करत सौरभ आप्पाविरोधातील तक्रार मागे घेण्याची धमकी देत सोडून दिले. याप्रकरणी बोईसर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल झाला असावा; परंतु या प्रकरणाची बोईसर पोलिस ठाण्यातून माहिती घेऊन कारवाईचे निर्देश दिले जातील.
- बाळासाहेब पाटील, पोलिस अधीक्षक, पालघर

गेल्या तीन दिवसांपासून कामानिमित्त ठाणे शहरात आहे. अपहरण आणि मारहाणीच्या घटनेशी माझा संबंध नाही. सुमित सिंग याचे पैसे दिले आहेत.
- सौरभ आप्पा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.